उपकरप्राप्त इमारतींना तीन एफएसआय, ९५च्या झोपडय़ांना हस्तांतरणाचा हक्क आणि महाविद्यालयीन निवडणुकांची पुन्हा सुरुवात, ही विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवडय़ाची उपलब्धी म्हणावी लागेल.
पोलिस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना मारहाण करण्यात आलेल्या पाच आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव याच आठवडय़ात मंजूर झाला आणि मनसेचे आणखी एक आमदार प्रवीण दरेकर यांना याच आठवडय़ात निलंबित व्हावे लागले.
मुंबईच्या प्रश्नांवर पहिल्या आठवडय़ात नियोजित असलेली चर्चा गणसंख्येअभावी स्थगित करावी लागण्याची नामुष्की आली होती. ती चर्चा दुस-या आठवडय़ात सविस्तर झाली. सुमारे आठ तास चाललेल्या या चर्चेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक तासाचे उत्तर देताना मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मोडकळीस आलेल्या इमारतींच्या प्रश्नांवर भर दिला. मुंबईतील जुन्या उपकरप्राप्त इमारतींना सरसकट तीन एफएसआय जागा देऊन त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केला आहे. यापूर्वी तो फक्त अ दर्जाच्या उपकरप्राप्त इमारतींनाच मिळत होता. ठाणे जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर एमएमआरडीएने बांधलेल्या इमारतीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १९९५ पूर्वीच्या झोपडय़ांच्या हस्तांतरणाला परवानगी देऊन झोपडपट्टीवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मुंब्रा येथे बांधकाम सुरू असताना इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वपूर्ण निर्णय या आठवडय़ात जाहीर केले. इमारतीचे आराखडे बनवणा-या स्ट्रक्चर इंजिनीअर्सना नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आणि नोंद केलेल्या स्ट्रक्चर इंजिनीअरकडूनच इमारतीचा आराखडा तयार करून घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. बांधकामांच्या प्रत्येक टप्प्यावर स्ट्रक्चर ऑडिट होईल. एवढे केल्यानंतर जर इमारत ३० वर्षाच्या आत कोसळली तर स्ट्रक्चर इंजिनीअरला जबाबदार धरण्यात येणार आहे. अनधिकृतपणे उभ्या राहणा-या इमारती पाडून त्या जमिनी सरकारजमा करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी अनेक पश्नांना सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला असताना विरोधकांनी सभात्याग केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात पोलिस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी पाच आमदारांचे करण्यात आलेले निलंबन बुधवारी मागे घेण्यात आले. मात्र त्यानंतर तिस-याच दिवशी मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांना निलंबित व्हावे लागले. मुंबईच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिल्यानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांना उपप्रश्न विचारण्याची संधी दिली होती. दरेकर हेही आपल्याला संधी मिळावी, अशी मागणी करत होते. मात्र त्यांना संधी मिळण्यापूर्वीच पुरके यांनी पुढील कामकाज पुकारले. त्या वेळी सभागृहात गोंधळ झाला. विरोधक सभात्याग करत असल्याचे सांगत घोषणा देत सभागृहाबाहेर जाऊ लागले. याच वेळी प्रवीण दरेकर हे मुख्यमंत्र्यांविषयी काही तरी अशोभनीय बोलले असल्याचे सत्ताधारी आमदारांनी उपाध्यक्ष पुरके यांच्या लक्षात आणून दिले. उपाध्यक्ष वसंत पुरके म्हणाले, मीही ते बोलणे ऐकले असून त्याची दखल घेतली आहे. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दोन वेळा बंद झाले. अखरे दरेकर यांना निलंबित करण्यात आले.
महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा घ्याव्यात, ही मागणी सभागृहात चांगलीच गाजली. सर्वच पक्षांनी सकारात्मक विचार मांडत या निवडणुका निर्भय वातावरणात पार पडल्या पाहिजे,अशी भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही लक्षवेधी मांडली होती. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी लक्षवेधीला उत्तर देताना महाविद्यालयीन निवडणुका सुरू करण्याचा विचार केला जाईल, असे सांगितले.
लोकांच्या हिताच्या प्रश्नांसाठी आपण संवेदनशील आहोत हे नारायण राणे यांनी दोन प्रश्नांच्या उत्तरात दाखवून दिले. शालेय शिक्षण विभागावरील चर्चेदरम्यान सदस्यांनी आधारकार्डाशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. खरे तर ही लक्षवेधी शिक्षण विभागाची होती. मात्र नारायण राणे यांनी हस्तक्षेप करून जोपर्यंत सर्वाना आधारकार्ड मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही शासकीय योजनेसाठी आधारकार्डाची सक्ती करू नये, अशा सूचना जिल्हाधिका-यांना केल्या जातील, असे सांगितले. तसेच नगर जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावर मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ही लक्षवेधी रोजगार हमी योजनेची होती. पण इथेही राणे यांनी सरकारच्या वतीने मदतीचे आश्वासन देऊन गरिबांविषयी आपल्या हृदयात असलेला कळवळा दाखवून दिला. दरेकर यांच्या निलंबनाच्या गोंधळात दुसरा आठवडा संपला. तिसरा आठवडा त्याच मुद्दय़ावर गाजण्याची शक्यता आहे.