रस्त्यांवरील खड्डयांबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेल्या मालाचे नमुने महापालिकेच्या वरळी येथील प्रयोगशाळेत तपासण्याचे निर्देश दिले होते.
मुंबई- रस्त्यांवरील खड्डयांबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेल्या मालाचे नमुने महापालिकेच्या वरळी येथील प्रयोगशाळेत तपासण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार या तपासणीदरम्यान ज्या कंत्राटदारांचे नमुने अपयशी ठरले त्या कंत्राटदारांवर महापालिकेने कारवाई करत संबंधित कत्रांटदारांना ३९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
प्रयोगशाळेमध्ये करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान महापालिकेच्या एन, के/पश्चिम, आर/मध्य या विभागांमधील नमुने अपयशी ठरले आहेत. त्यामुळे परिमंडळ ४ (के/पश्चिम विभाग) व परिमंडळ ६ (एन विभाग) मध्ये कार्यरत असणा-या योगेश कन्स्ट्रक्शन व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारास १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर परिमंडळ ७ (आर/मध्य विभाग)मध्ये कार्यरत असणा-या कमल एन्टरप्रायजेस व शौनक इन्फ्रास्ट्रक्चरच्या या कंत्राटदारास रुपये ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
त्याचबरोबर कोल्डमिक्स बॅगेवर उत्पादकाचा तपशील नसणे, कोल्डमिक्स बॅग्ज फाटलेल्या असणे किंवा सीलबंद नसणे, कोल्डमिक्स गुणवत्ता तपासणीसाठी संबंधित उत्पादकाचे अभियंता उपलब्ध नसणे आदी त्रुटींसह आर/उत्तर, आर/दक्षिण व जी/दक्षिण या विभागांमध्ये संबंधित साहित्यांचा साठा करण्यासाठी स्वतंत्र गोदाम नसणे अशा प्राथमिक त्रुटींसाठी प्रत्येक विभागनिहाय संबंधित कत्रांटदारांना प्रत्येकी रुपये १ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
योगेश कन्स्ट्रक्शन्स व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारांना १० लाख रुपयांच्या दंडाशिवाय आणखी ६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर कमल एन्टरप्रायजेस व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर यांना आणखी ३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रस्त्यांवरील खडयांबाबत परिमंडळ निहाय ठोठावण्यात आलेल्या दंडाचा तपशील
खड्डे न भरणा-या कंत्राटदाराचे नाव दंडांची रक्कम
» मे. भारत कन्स्ट्रक्शन व शौनक इन्फ्रास्ट्रक्चर ५ लाख रु.
» मे. कमला कन्स्ट्रक्शन कं. व मे. वंडर टेक्नॉलॉजी ४ लाख रु.
» मे. कोणार्क कं. इ. प्रा. लि. व मे. शौनक इन्फ्रास्ट्रक्चर ३ लाख रु.
» मे. योगेश कन्स्ट्रक्शन्स व मे. शौनक इन्फ्रा ८ लाख रु.
» मे. आकाश इं. क. व मे. वंडर टेक्नॉलॉजी ३ लाख रु.
» मे. योगेश कन्स्ट्रक्शन्स व मे. शौनक इन्फ्रास्ट्रक्चर ८ लाख रु.
» मे. कमल एन्टरप्रायजेस व मे. शौनक इन्फ्रास्ट्रक्चर ८ लाख रु.