अलीकडे गुन्हेगारी कारवायांसाठी सतत चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये धावत्या गाडीत एका 14 वर्षीय विद्यार्थींनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नाशिक – अलीकडे गुन्हेगारी कारवायांसाठी सतत चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये धावत्या गाडीत एका 14 वर्षीय विद्यार्थींनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवव्या इयत्तेत शिकणारी ही विद्यार्थीनी बुधवारी संध्याकाळी चेतना नगर परिसरातून चालत असताना, तिला जबरदस्तीने गाडीत खेचून घेण्यात आले व धावत्या गाडीत तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
त्यानंतर रात्री चेतना नगर परिसरातच पिडीत तरुणीला सोडण्यात आले. आरोपींनी तिला गाडीतून उतरविताना कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तरीही तिने हिम्मत करुन आपल्या मोठया बहिणीला घडला प्रकार सांगितला. बहिणीने आई-वडिलांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
पिडीत तरुणीची वैद्यकीय चाचणी झाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त कुलवंत कुमार सारंगल यांनी पिडीत तरुणीच्या पालकांची भेट घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.