नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याचे पावन पर्व सुरू असतानाच दुसरीकडे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
नाशिक- नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याचे पावन पर्व सुरू असतानाच दुसरीकडे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. तर संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये तीन वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह २० पोलीस जखमी झाले आहेत.
नाशिकच्या पेठ तालुक्यातील हर्सुलमध्ये दोन गटांत ही हाणामारी झाली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तर संतप्त जमावाने दगडफेक केली. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांचीही जाळपोळ केली.
दोन गटांत जुन्या वादातून या हाणामारीला सुरुवात झाली. त्यानंतर हा वाद वाढला. सध्या हर्सुलमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. गेले अनेक दिवस नाशिकमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.