नालासोपारा पूर्व परिसरात विकासकावर गोळया झाडून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी भरदिवसा घडली
नालासोपारा – नालासोपारा पूर्व परिसरात विकासकावर गोळया झाडून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी भरदिवसा घडली. राजेश सिंग असे या विकासकाचे नाव आहे.
लाल रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार करून ते पसार झाले. गोळीबारात दोन गोळ्य़ा राजेश यांच्या डोक्यात लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नालासोपारा पूर्व साईनाथ नगर येथील दीप रेसीडेन्सीत दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरातील रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
नालासोपा-यात दीप रेसिडेन्सी इमारतीत राजेश सिंग यांचे खुशबु ट्रेडर्स बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. राजेश सिंगकडे त्रिलोकचंद नावाची गॅस एजन्सी आहे. बुधवारी राजेश आपल्या कार्यालयाच्या बाजूच्या श्री पद्मावती जेम्स दुकानासमोर उभे होते. त्यावेळी मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने गोळीबार करून ते पसार झाले. या वेळी दोन गोळया सिंग यांच्या डोक्यात लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिस अधिक तपास करत आहेत.