वसई-विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात बांधकामांना ऊत आला असून बोगस ‘सीसी’ म्हणजे पूर्णत्वाच्या दाखल्याचाही सुळसुळाट झाल्याची चर्चा सुरू आहे.
विरार – वसई-विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात बांधकामांना ऊत आला असून बोगस ‘सीसी’ म्हणजे पूर्णत्वाच्या दाखल्याचाही सुळसुळाट झाल्याची चर्चा सुरू आहे. अशाच प्रकारे बनावट सीसी व कागदपत्रे तयार करुन सरकारी जागेवर घरे बांधून विकणा-या सुमारे १० बिल्डरांविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर काही ठिकाणी अजूनही बनावट कागदपत्रांच्या आधारे सात-सात मजल्यांच्या इमारती उभ्या राहात असून यातून सर्वसामान्यांची मोठी फसवणूक होत असल्याने महापालिकेने या प्रकारांना आळा घालणे गरजेचे बनले आहे.
नालासोपारा पश्चिम भागातील हनुमान नगर येथे सव्र्हे क्रमांक ३२ मधील सरकारी जमिनीवर १५ ते २० बिल्डरांनी कब्जा करून २५ ते ३० अनधिकृत इमारती बांधल्या आहेत. याबाबत हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाल्याने तहसीलदार, महसूल विभाग व वसई-विरार महानगरपालिकेने संयुक्त कारवाई करत ७ ते ८ इमारती पाडल्या. त्यानंतर या इमारतींमध्ये राहणा-या नागरिकांनी बिल्डरांकडून पैसे परत मिळावे यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. ही घरे अधिकृत असल्याचे बिल्डर खुलेआमपणे ग्राहकांना सांगतात. मात्र त्याच इमारती आता तुटल्याने हा सारा बनावट सीसी व कागदपत्रांचा घोळ पुढे आला आहे.
अशाच प्रकारे मैत्री इंटरप्रायजेस कंपनीने मालाड मालवणी येथील जॉन डिसोझा (३५) यांना १६०० स्क्वेअर फुटांच्या दोन घरांच्या बदल्यात १५ लाखांना गंडवले आहे. बिल्डर आनंद सिंह उर्फ बाळा आणि राजेंद्र पटेल यांनी परत पैसे मागण्यास गेलेल्या जॉन डिसोझा यांना धमकी दिली यानंतर डिसोझा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या दोन बिल्डरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे सिंह डेव्हलपर्सने विलेपाल्रे येथील हेमल देसाई (४०) यांच्याकडून घरासाठी १३ लाख २० हजार रुपये व त्यांची मैत्रीण तृप्ती खांबे यांच्याकडून ९ लाख ४८ हजार रुपये घेतले.
मात्र ज्या इमारतीत या दोघींना घरे दिली गेली, ती इमारत पाडण्यात आली असून बिल्डरांना पैसे परत मागूनही मिळत नसल्याने या दोघींच्या तक्रारीवरुन बिल्डर दिलीप सिंह, अमित सिंह, अब्दुल कादिर खान, नौशाद, आशिष सिंह, प्रमोद प्रजापती, विशाल सिंह आणि प्रकाश कामत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात अजूनही अशाप्रकारची अनेक बांधकामे सुरू असल्याचे बोलले जात असून दिघावासियांवर जशी वेळ आली, तशी उद्या येथील नागरिकांवर येऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी हे प्रकार आत्ताच गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
बनावट सीसी व बोगस कागदपत्रे बनवून लोकांची फसवणूक करणाऱ्या १० बिल्डरांविरुद्ध वेगवेगळे २ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – रविंद्र बडगुजर, पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे.
वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये अनेक बांधकामे सरू असून या सर्व बांधकामांची कागदपत्रे तपासण्यासाठी अधिकारी कर्मचारी नेमण्यात येतील. सीसी देण्याचा अधिकार नगररचना विभागाकडे असून त्यांनीही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. – सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका.