नालासोपा-यात सापडलेल्या स्फोटकं व हत्यारे प्रकरणी मुंबईतील घाटकोपरमधून अविनाश पवार या ३० वर्षीय तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.
मुंबई- नालासोपा-यात सापडलेल्या स्फोटकं व हत्यारे प्रकरणी मुंबईतील घाटकोपरमधून अविनाश पवार या ३० वर्षीय तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र तो कोण आहे?, त्याचा गुन्ह्यातील नेमका सहभाग काय? याबाबत कोणतेही तपशील अद्याप पोलिसांनी दिलेले नाही.
अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली. त्यामुळे नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. याआधी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर व माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना अटक केली आहे.
हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या नालासोपा-यातील घरातून २२ गावठी बॉम्ब, डिटोनेटर आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य १० ऑगस्ट रोजी जप्त करण्यात आले होते. तसेच राऊतसह शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेत असलेल्या या सर्वांकडून मिळालेल्या माहितीवरून आणि त्यांच्याशी संपर्कात असलेल्या १३ – १४ जणांना मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागांतून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात राऊतचे नाव समोर आल्याने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. पुरेशी माहिती मिळताच मध्यरात्री नालासोपा-यातील घरावर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी दोन जणांना एटीएसने अटक केली. त्यातील शरद कळसकर हा नालासोपा-याचा, तर सुधन्वा गोंधळेकर हा पुण्याचा आहे. हे दोघेही राऊतच्या संपर्कात होते. गावठी बॉम्ब बनविण्यासाठी दोघांनी राऊत याला मदत केल्याचे एटीएस अधिका-यांचे म्हणणे आहे.
त्याचबरोबर स्फोटक प्रकरणात संशयित असलेला आणखी एक आरोपी शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर (४१) याला एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने १९ ऑगस्टला अटक केली आहे. न्यायालयाने श्रीकांतला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तो शिवसेनेकडून दोनदा नगरसेवक होता. कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्याची जालन्यात ओळख आहे.