नालासोपारा रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वेचे विरार स्थानकापूर्वीचे मोठय़ा गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. विरारला जाणारी लोकल पूर्वी भाईंदर स्थानकात अर्धी रिकामी होत असे, परंतु …
नालासोपारा रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वेचे विरार स्थानकापूर्वीचे मोठय़ा गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. विरारला जाणारी लोकल पूर्वी भाईंदर स्थानकात अर्धी रिकामी होत असे, परंतु आता अर्ध्याहून अधिक नालासोपा-यालाच रिकामी होते. इतके महत्त्वाचे स्थानक असूनही, या स्थानकात मोठ्या प्रमाणात गैरसोयी आहेत. नालासोपारा स्थानकावरील फलाट क्रमांक-१ची उंची कमी आहे. काही प्रमाणात फलाटांची उंची वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी ही उंची पुरेशी नाही.
फलाट क्रमांक-२वर सव्वा फुटाची उंची फलाट व गाडीदरम्यान आहे. या फलाटावर महिलांच्या डब्याजवळ खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे महिलांना त्रास होतो. तर फलाट क्रमांक-३वर कोटा लाद्या बसवण्यात आल्या असून, त्या गुळगुळीत झाल्याने पाय घसरून प्रवासी पडण्याच्या घटना घडत आहेत.
फलाट क्रमांक-४वरच्या लाद्या तर तुटलेल्याच आहेत. या स्थानकावर फलाट क्रमांक-१वर विरार दिशेला एकमेव प्रसाधगृह आहे. अनेकदा फलाट क्रमांक-४वर येणारी गाडी अचानक रद्द करून दोनवरून सकाळी जाते. या स्थानकावर प्रवाशांसाठी तीन पूल असले तरी त्यावर फेरीवाल्यांनीच कब्जा केला आहे. तसेच स्थानकांच्या प्रवेशमार्गावरच फेरीवाल्यांनी गाड्या लावल्यामुळे एकाच वेळी प्रवाशांना ये-जा करताना मोठय़ा दिव्यातून जावे लागते.
ग्रँट रोड स्थानकातील फलाट क्रमांक-१च्या रंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या फलाटावर कामानिमित्त वापरलेल्या रेतीमुळे प्रवासी घसरून पडत असल्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबई सेंट्रल येथील रहिवासी असलेली एक महिला फलाटावर असलेल्या रेतीवरून पाय घसरून जखमी झाली होती.