नालासोपा-यात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. तासन्तास रांगेत उभे राहूनही रहिवाशांना हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गॅस सिलिंडर मिळत नाही.
मुंबई – नालासोपा-यात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. तासन्तास रांगेत उभे राहूनही रहिवाशांना हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गॅस सिलिंडर मिळत नाही. नालासोपारा पश्चिम येथे असणा-या चिराग एजन्सीच्या गॅस कार्यालयात गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी लोकांची मोठी दमछाक होत आहे. मात्र लोकांच्या अडचणीची दखल एजन्सीकडूनही घेतली जात नसल्यामुळे अनेक कुटुंबांना त्याची झळ बसली आहे.
नालासोपारा पश्चिम येथे रेल्वे स्थानकाजवळ हिंदुस्थान पेट्रोलियम गॅस कंपनी एजन्सीचे गॅस सिलिंडरचे वितरण कार्यालय आहे. मात्र सिलिंडरची गाडी येत नाही, सिलिंडर शिल्लक नाही, अशी कारणे देत या कार्यालयातून नागरिकांना घरी पाठवले जात आहे. या कार्यालयात नालासोपारा पूर्व भागातील तुळींजपासून ते नालासोपारा पश्चिम येथील निळेमोरे गावापर्यंतच्या कुटुंबाना गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. गॅस एजन्सीतील काही कामगार रहिवाशांना सिलिंडर न देता खाद्यपदार्थ विक्रेते तसेच बेकायदा पद्धतीने सिलिंडर पुरवत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होऊनही येथील कामगारांकडून हा प्रकार सुरूच आहे.
या एजन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन नसून एक सिलिंडर असलेल्या कुटुंबाला जो न्याय आहे तोच न्याय दोन सिलिंडर असलेल्या कुटुंबाना दिला जात असल्याची खंत पारूबाई मेहता या गृहीणीने केला आहे. आपल्याकडे केवळ एकच सिलिंडर असून आपण गेले चार दिवस कार्यालयात हेलपाटे करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पण सिलेंडर दिला जात नाही. सिलिंडर नसल्यामुळे चूल पेटत नाही, रोजच्या रोज बाहेरून जेवण मागवणे गरीब कुटुंबांना शक्य नसल्याने स्टोव्ह विकत घेण्या भरुदड सहन करावा लागत असल्याचेही अनेक रहिवाशांनी सांगितले.
एजन्सीच्या कार्यालयात वारंवार तक्रार करूनही सिलिंडर उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक रहिवाशांनी संताप व्यक्त करत कार्यालयावर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानिक नगरसेवक अनिल भोगले यांनी मध्यस्थी करत संतप्त लोकांचे तसेच एजन्सीच्या व्यवस्थापकांचे म्हणणे ऐकून घेतले.
नालासोपारा पूर्व भागातून लोक एजन्सीत रिक्षाने सिलिंडर नेण्यासाठी येतात. त्यांना तिथेच सिलेंडर देण्याची सूचना भोगले यांनी एजन्सीला केली. तसेच जोपर्यंत नागरिकांना सिलिंडर मिळत नाही, तोपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही सिलिंडर दिले जावू नये असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
चिराग गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकांनी मात्र सिलिंडरची वाहने कमी प्रमाणात येत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. परंतु लोकांची गरसोय होवू नये यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. दुसरीकडे सिलिंडरचाही तुटवडा असल्यामुळे वेळच्या वेळी सिलिंडर मिळत नाहीत. परंतु सर्वानाच सिलिंडर मिळावा यासाठी आपण प्रयत्न आपण करत असल्याचेही एजन्सीच्या व्यवस्थापकांनी सांगितले.