आगामी ९५व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनासाठी निधीची कमतरता जाणवत असून संमेलनाचे बजेट अडीच कोटींवरून सव्वा कोटीवर आणण्यात आले आहे.
बेळगाव – आगामी ९५व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनासाठी निधीची कमतरता जाणवत असून संमेलनाचे बजेट अडीच कोटींवरून सव्वा कोटीवर आणण्यात आले आहे. संमेलनासाठी अनेक जणांनी मदतीचा हात पुढे केला असून बेळगावचे पर्यावरणवादी डॉ. नितीन खोत यांनी २० लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी नाटय संमेलनाच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाच्या स्वागत आणि सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अशोक साठे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
नाटय संमेलनातील विविध कार्यक्रमांसाठी कलाकारांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. सीमाप्रश्नाचा ठराव संमेलनात मांडण्याबाबत अद्याप बैठक झालेली नाही, असे दीपक करंजीकर यांनी सांगितले. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी क्लब रोडवरील सी पी एड मैदानावरील बाळासाहेब ठाकरे नाटय नगरीतील स्मिता तळवलकर मुख्य रंगमंचावर सायंकाळी ४.३० ते ८. ३० या वेळेत गानरंग, भारूड, नृत्यरंग, गीतरामायण आणि प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.५० वाजता स्मिता तळवलकर मुख्य रंगमंचावर सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्य, शालेय आणि क्रीडामंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. आमदार उदय सामंत आणि किरण ठाकूर यांची याप्रसंगी सन्माननीय उपस्थिती असणार आहे.
७ फेब्रुवारी रोजी जे. एन. मेडिकल कॉलेजच्या जिरगे सभागृहातील कुलदीप पवार रंगमंच येथे दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत विविध एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता जिरगे सभागृहातील नयनतारा रंगमंचावर आयदान नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी लोकमान्य रंगमंदिर येथील सदाशिव अमरापूरकर रंगमंचावर दुपारी २ वाजता नादखुळा ही एकांकिका सादर केली जाणार आहे. दुपारी ३ वाजता नाटय संमेलनाध्यक्ष फय्याज यांची प्रकट मुलाखत आणि गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत चार एकांकिका सादर करण्यात येणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता भांदूर गल्ली येथून नाटय िदडी निघणार आहे. नाटय िदडीत मोठय़ा संख्येने बेळगावकर आणि कलावंत सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५ वाजता संगीत मैफल होणार असून त्यामध्ये संमेलनाध्यक्ष फय्याज यांच्यासह अनेक नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता नृत्य कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वगनाटय आणि कलावंत रजनी कार्यक्रम होणार आहे. हे सारे कार्यक्रम मुख्य रंगमंचावर होणार आहेत. ८ रोजी समारोप कार्यक्रमाला सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून उदय सामंत, हेमंत पाटील आणि किरण ठाकूर यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. संमेलनात विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला स्थानिक नाटय शाखेच्या अध्यक्ष वीणा लोकूर आदी उपस्थित होत्या.