नागपुरात गुंडांचा हैदोस सुरू आहे. मात्र पोलीस यंत्रणा त्यांना रोखण्यात अपयशी ठरली आहे.
नागपूर- नागपुरात गुंडांचा हैदोस सुरू आहे. मात्र पोलीस यंत्रणा त्यांना रोखण्यात अपयशी ठरली आहे. बुधवारी मध्यरात्री २५ ते ३० गुंडांच्या टोळीनं पूर्ववैमनस्यातून संतोष यादव नावाच्या व्यक्तीवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली.
संतोष हा अगोदर गुंड होता. परंतु सध्या त्याने गुंडगिरी सोडली आहे. पण जुन्या वादातून या गुंडांनी हातात तलवारी, गुप्ती आणि इतर हत्यारे घेऊन संतोषवर हल्ला केला. पण या हल्ल्यातून संतोषने आपला जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला.
दरम्यान संतोषला शोधण्यासाठी ही टोळी तो राहत असलेल्या म्हाडा कॉलनीत गेले. तेथील लोकांच्या गाडय़ा फोडल्या. म्हाडा कॉलनीत धुमाकूळ माजवल्यानंतर गुंडांची ही टोळी थांबली नाही. तर या टोळीने टेकानाका परिसरातील आवळे नगरात गुलाब अटराहे यांच्या घरावर हल्ला केला.
तलवार आणि इतर हत्याराने गुंडानी अटराहे यांच्या घराबाहेर ठेवलेली स्विफ्ट कार तोडली. गुंडांचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.