लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी नवे लष्करप्रमुख म्हणून गुरुवारी सूत्र हाती घेतले.
नवी दिल्ली- लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी नवे लष्करप्रमुख म्हणून गुरुवारी सूत्र हाती घेतले. लेफ्टनंट जनरल बिक्रम सिंग हे ३१ जुलैला निवृत्त झाले. त्यामुळे विक्रम सिंग यांनी गुरुवारी सुहाग यांच्याकडे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार सोपवला.
सुहाग यांची मे महिन्यातच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात लष्करप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. ५९ वर्षांचे सुहाग लष्करातील सर्वात ज्येष्ठ उपलष्करप्रमुख आणि गुरखा लेफ्टनंट जनरल अधिकारी आहेत.
मात्र केंद्र सरकारमधील मंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी सुहाग यांच्या लष्करप्रमुखपदी नियुक्तीला विरोध केला होता. तसेच लेफ्टनंट जनरल रवी दास्ताना यांनी वशिलेबाजीने सुहाग यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र हे सर्व आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले होते.
हरयाणामधील झज्जर जिल्ह्यातील बिशन या गावातील एका जाट कुटुंबात दलबीर सिंग सुहाग यांचा जन्म झाला. १९७० मध्ये सुहाग हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांच्याकडे १९७४ मध्ये पाचव्या गोरखा रायफल जवानांच्या चौथ्या बटालियनचे नेतृत्व देण्यात आले. चित्तोडगडमधील सैनिकी शाळेतून त्यांनी शिक्षण घेतले.
डेहराडून येथील भारतीय लष्कर अकादमीमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले आहे. श्रीलंकेतील १९८७ मधील ऑपरेशन पवन या सैनिकी कारवाईत ते कंपनी कमांडर होते. जुलै २००३ ते मार्च २००५ पर्यंत त्यांनी काश्मीर खो-यात दहशतवाद्यांच्या घुसखोरीविरोधातील कारवाईत लष्कराच्या ५३ व्या तुकडीचे नेतृत्व केले. तसेच ऑक्टोबर २००७ ते डिसेंबर २००८ पर्यंत ते कारगिल येथे आठव्या तुकडीचे नेतृत्व केले. लष्कराच्या सरहद्दीच्या दलाच्या महानिरीक्षकपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुहाग यांची डिसेंबर २०१३ मध्ये उपलष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी ते पूर्व सैन्य दलाचे कमांडरपदी कार्यरत होते.
देशाचे २६ वे लष्करप्रमुख म्हणून सुहाग हे ३० महिने कार्यरत राहतील. दिवंगत फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यानंतर गोरखा रायफल बटालियनमधील ते दुसरे लष्करप्रमुख असणार आहेत.
सिंह लष्करप्रमुख असताना २०१२ मध्ये आसाममध्ये दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या एका मोहिमेत कमांडर सुहाग यांना अपयश आले होते. त्यावेळी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनीच सुहाग यांच्यावर ‘डिसिप्लिनरी अँड व्हिजीलन्स बॅन’ अंतर्गत कारवाई केली होती. मात्र, बिक्रम सिंग यांच्या कार्यकाळात सुहाग यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आणि न्यायालयानेही त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
नव्या लष्करप्रमुखांना लष्करातील कामकाजाचे उत्तम ज्ञान आहे, अशा शब्दांत निवृत्त झालेल्या लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग यांनी सुहाग यांची स्तुती केली. तसेच त्यांचे अभिनंदनही केले.