दादर स्थानकातील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवरील परळ स्थानकात टर्मिनस उभारण्याचा मागील अनेक वर्षापासूनचा प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे.
मुंबई- दादर स्थानकातील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवरील परळ स्थानकात टर्मिनस उभारण्याचा मागील अनेक वर्षापासूनचा प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून जून महिन्यापासून प्रत्यक्षात टर्मिनसच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
त्यानंतर १८ ते २० महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे. या टर्मिनस स्थानकात नव्याने प्रवासी सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या या प्रकल्पाकरता एकूण ५२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामधील २८ कोटी रुपये प्रवासी सुविधांवर खर्च केले जाणार असून उर्वरित निधी इतर कामांकरता वापरण्यात येणार आहे. दादर स्थानकातील भार कमी करण्यासाठी आणि परळ भागात नव्या कॉर्पोरेट कंपन्यांमुळे वाढलेली प्रवासी संख्या आटोक्यात आणण्यासाठी मध्य रेल्वेला परळ टर्मिनसची नितांत गरज भासू लागली होती. अखेर हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याने अनेक समस्यांतून प्रवाशांना मुक्ती मिळणार आहे.
सध्या परळ स्थानकातील प्रवाशांच्या तुलनेत अपुरे पादचारी पूल आणि अनेक प्रवासी सुविधांचा अभाव यामुळे प्रवाशांना मोठया समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे दोन वर्षापूर्वी बासनात गुंडाळलेल्या या प्रकल्पाला नव्याने पुनर्जीवन देण्यात आल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.
दरम्यान, मुंबईतील प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणा-या या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मध्य रेल्वेच्या अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
टर्मिनसचा फायदा
» फलाटांची होणार नव्याने निर्मिती
» सध्याच्या फलाट क्रमांक एकच्या बाजूला उभारण्यात येणा-या फलाटावरून परळ लोकल चालवणार.
» छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेकडे नव्याने पादचारी पूल बांधून या उन्नत पादचारी पुलावर नवीन तिकीट घर उभारणार
» सर्व फलाटांच्या रुंदीत वाढ करून ती १० मीटर एवढी करणार.
» परळ स्थानकाच्या मध्यावर नव्याने पादचारी पूल उभारून कल्याणच्या दिशेचा पूल एल्फिन्स्टन रोडच्या रस्ते पुलाशी जोडणार.
» छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने येणारा स्कायवॉक कॅरॉल पुलाला जोडला जाणार
» सध्याच्या यार्डाची रचना बदलून आधुनिक करणार