मुंबईत अनेक इमारती बांधल्या जात असून या नव्या इमारतींमध्ये पाणी न आल्यास टँकरद्वारे पाणी पुरवताना टँकर हे रस्त्यावर लावले जातात.
मुंबई- मुंबईत अनेक इमारती बांधल्या जात असून या नव्या इमारतींमध्ये पाणी न आल्यास टँकरद्वारे पाणी पुरवताना टँकर हे रस्त्यावर लावले जातात. तर ब-याच ठिकाणी आतमध्ये जाण्यास मार्ग नसल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नव्याने बांधल्या जाणा-या इमारतींमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करता येईल, अशी स्वतंत्र जलवितरण व्यवस्था करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशाप्रकारचा ठराव महापालिकेत मांडण्यात आला आहे. अशाप्रकारे यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ‘आराखडे ना पसंतीच्या सूचना’ (आयओडी) यात ही अट समाविष्ट करून ते बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी याद्वारे केली आहे.
मुंबईमधील सुमारे १०० ते १५० वर्षे जुन्या असलेल्या चाळींचा पुनर्विकास होऊन त्याठिकाणी उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र,अशा बहुतांश इमारतींच्या ठिकाणी पाणीपुरवठा करणा-या पाण्याच्या टाक्या या इमारतीच्या प्रवेशद्वारापासून आतील बाजूस, तसेच इमारतीच्या पाठीमागे जमिनीपासून काही उंचीवर बसवण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे काही प्रसंगी महापालिकेकडून अपुरा पाणीपुरवठा झाल्यास किंवा शंभर टक्के पाणीकपात असल्यास त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु अपु-या जागेअभावी पाण्याचा टँकर इमारतीच्या बाहेर रस्त्यावर उभा करावा लागतो.
रस्त्यापासून त्या इमारतीच्या पाण्याच्या टाक्या लांब अंतरावर असतात. तर काही ठिकाणी जमिनीपासून काही उंचीवर असल्याकारणाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न अनेकदा असफल ठरतो, असे स्पष्ट करत शिवसेना नगरसेवक सुरेंद्र बागलकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे.
या मागणीत बागलकर यांनी विकासकांना, प्रत्येक इमारतीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करता येईल, अशाप्रकारच्या यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी बंधनकारक करण्यात यावे. यासाठी आयओडीमध्ये अशाप्रकारची अट समाविष्ट करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी या ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. याबाबत मांडण्यात आलेला ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवला जाणार आहे.
स्वतंत्र व्यवस्थेची ठरावाच्या सूचनेद्वारे
» सभागृहात मागणी
» रस्ता अडवणा-या टँकरसाठी सुचवला नवा पर्याय
» आयओडीत अट घालण्याचा ठराव