डान्सबार बंदीच्या कायद्यावर न्यायालयात आपली भूमिका मांडण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारकडून सोमवारी विधान परिषदेत डान्सबारचे नवीन विधेयक मांडण्यात आले.
मुंबई- डान्सबार बंदीच्या कायद्यावर न्यायालयात आपली भूमिका मांडण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारकडून सोमवारी विधान परिषदेत डान्सबारचे नवीन विधेयक मांडण्यात आले. या विधेयकावर सभागृहातील सर्व सदस्यांनी कोणत्याही प्रकारची चर्चा उपस्थित न करताच ते एकमताने मंजूर करण्यात आले.
या नवीन विधेयकात डान्सबार व परिसरासाठी अनेक प्रकारच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र हॉटेल रेस्टॉरंट व बाररूमध्ये चालणा-या अश्लील नृत्यावर प्रतिबंध व यात काम करणा-या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६’ असे या विधेयकाचे नाव असून याला विरोधी पक्षाच्या सदस्यांकडूनही संमती देत ते चर्चेविना मंजूर करण्यात आले.
विधान परिषदेचे सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी डान्सबारविषयीचे महाराष्ट्र हॉटेल रेस्टॉरंट व बाररूममध्ये चालणा-या अश्लील नृत्यावर प्रतिबंध व त्यातील महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम २०१६ विधेयक सभागृहात मांडत या विषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली.
मात्र त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित व सतीश चव्हाण यांनी या प्रश्नी विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे या विधेयकावर चर्चेची आवश्यकता नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या विधेयकावर चर्चा करण्याची गरज नसल्याचे सांगत हे विधेयक मंजूर करण्याची विनंती सभागृह नेते खडसे यांना केली.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सदस्य आणि इतर सदस्यांसह सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही या भूमिकेचे स्वागत केले. सभागृहातील सदस्यांच्या भावनांचा विचार करून उपसभापती वसंत डावखरे यांनी हे विधेयक मांडल्याचे जाहीर करत ते एकमताने मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले.
विधेयकात नेमके काय?
» नृत्याविष्कार कोणत्याही प्रकारे अश्लील असणार नाही व महिलांच्या प्रतिष्ठेला कोणतीही हानी पोहोचवणार नाही, याची परवानाधारक खात्री करेल.
» एका मंचावर केवळ चार नर्तिका, नर्तक, कलाकार यांना नृत्याविष्काराची परवानगी असेल.
» बारमधील महिलांचे शोषण झाल्यास तीन वष्रे कारावास, तसेच १० लाखांचा दंड इतक्या शिक्षेची तरतूद.
» पैसे उडवणे व तत्सम वस्तू फेकणा-यांवर व नियमांचे उल्लंघन करणा-या गुन्हा सिद्ध झाल्यास सहा महिन्यांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा.
» नवीन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणा-या कोणत्याही व्यक्तीवर अदखलपात्र व जामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल व त्यास तीन महिन्यांपर्यंत कारावास आणि २५ हजाराच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद.
» सार्वजनिक क्षेत्र व्याख्याअंतर्गत येणा-या बारमधील जागेत अनिवार्य व ३० दिवसांचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक.
» डान्सबारमध्ये काम करणा-या कर्मचा-यांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंद होणार. कर्मचा-यांची तपशीलवार माहिती बार मालकाकडे आवश्यक.
» डान्सबार (नर्तक-नर्तिका) यांच्यावर पैसे उधळण्यास मनाई
» नर्तक-नर्तिकेच्या गुणगौरवासाठीचे पैसे बिलातून चुकते करावे लागतील
» प्रत्येक बारसाठी किमान तीन महिला सुरक्षा रक्षक असतील.
» बारमधील महिला कर्मचा-यांना घरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची व्यवस्था बारमालकांना करणे बंधनकारक. परमिट रूम आणि नृत्य कक्षात पक्की विभाजक भिंत असेल.
» मंच सर्व बाजूंनी तीन फूट उंचीचा कठडा घालून वेगळा करणे आवश्यक.
» कठडा आणि ग्राहक बैठक क्षेत्रात ५ फुटांचे अंतर असेल.
» ग्राहकाने विभागणी पार करू नये. कमीत कमी सहा इंच उंचीचा कठडा असेल.