महापौर, उपमहापौर आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा आणि काँग्रेस आदी पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
नवी मुंबई – महापौर, उपमहापौर आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा आणि काँग्रेस आदी पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीकडून सुधाकर सोनवणे, शिवसेनेकडून संजू वाडे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. तर काँग्रेसचे अविनाश लाड आणि भाजपाच्या उज्ज्वला झंजाट यांनी अर्ज दाखल केले आहेत.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीचे चार, शिवसेना चार आणि भाजपा आदी नऊ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या नऊ मे रोजी ही निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वात जास्त ५२ नगरसेवक निवडून आले असून पाच अपक्षांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीने सत्तेसाठी जादूई आकडा गाठला होता.
मात्र राजकीय कुरघोडी टाळण्यासाठी काँग्रेसच्या दहा नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. शिवसेना-भाजप युतीचे ४४ नगरसेवक निवडून आले आहेत. यात शिवसेनेचे ३७ आणि भाजपाचे ५ नगरसेवक आहेत. एकूण १११ नगरसेवक असलेल्या पालिकेत किमान ५६ या जादूई आकडय़ावर सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होणार होता.
मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने त्रिशंकू अवस्थेतील बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक विविध पदांवर विराजमान होणार आहेत. अपक्ष गट नेते म्हणून निवड झालेले सुधाकर सोनावणे यांना राष्ट्रवादीचे सदस्य करून घेतल्याने त्यांना महापौर पदाची लॉटरी लागणार आहे.
उपमहापौरपदी काँग्रेसचे अविनाश लाड यांची वर्णी लागणार आहे. राष्ट्रवादीने अपक्ष नगरसेविका सीमा गायकवाड यांचे राजकीय गुरू घन:श्याम मढवी, माजी सभागृह नेते अनंत सुतार माजी नगरसेवक सूरज पाटील आणि साबू डॅनियल यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून माजी नगरसेवक मनोज हळदणकर, राजेंद्र आव्हाड विसाजी लोके व माजी नगरसेवक राजेश शिंदे यांनी अर्ज दाखल केला.
भाजपाच्या दिलीप तिडके यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीतर्फे अनंत सुतार, साबू डॅनियल आणि घनश्याम मढवी हे स्वीकृत नगरसेवक म्हणून निश्चित मानले जात आहेत. तर शिवसेनेला संख्या बळाप्रमाणे दोन स्वीकृत नगरसेवक पाठवता येणार आहेत. राजेंद्र आव्हाड आणि राजेश शिंदे यांची नावे निश्चित मानली जात आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक, शिवसेनेचे ठाणे येथील स्थायी समिती साभापती नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, विजय चौगुले, आमदार मंदा म्हात्रे यांची उपस्थिती होती. येत्या नऊ मे रोजी ही निवडणूक झाल्यावर स्थायी समिती सोळा सदस्य विरोधी पक्षनेता विषय समित्या सदस्य आणि सभापती निवडले जाणार आहेत.