जर्मनीतील नाझी प्रचारप्रमुख जोसेफ गोबेल्स याचे तंत्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अवलंबले आहे.
नवी दिल्ली – ‘‘जनतेला सातत्याने खोटे सांगत राहिल्याने कालांतराने त्यांना ते खरे वाटू लागते,’’ हे जर्मनीतील नाझी प्रचारप्रमुख जोसेफ गोबेल्स याचे तंत्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अवलंबले आहे. त्यांचे वागणे स्वभाविक आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना ‘नाझी स्टाइल’ प्रशिक्षण दिले आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परदेश दौ-याबाबत मोदींनी केलेल्या आरोपांना दिग्विजय यांनी ट्विटरवरून उत्तर दिले.
‘‘संघाकडून आपल्या प्रशिक्षणार्थीना चुकीची माहिती पुरवून नाझी प्रणालीनुसार प्रशिक्षण दिले जाते. मोदी हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळेच ते खोटे आरोप करून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या विषयाचे राजकारण करत आहेत. त्यांच्या वर्तणुकीतून भाजपचा खोटारडेपणा व हीन मानसिकता दिसून येते,’’ असे दिग्विजय यांनी म्हटले आहे.
सोनिया गांधी यांच्या अलीकडच्या परदेश दौऱ्यावरील खर्चाबाबत मोदी यांनी वाटेल ते आरोप केले होते. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आपण हे वक्तव्य करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. रमेश शर्मा नावाच्या आरटीआय कार्यकर्त्यांने सोनिया गांधी यांच्या दौऱ्याविषयी सरकारकडून ही माहिती मिळवल्याचा दावाही मोदी यांनी केला होता. रमेशने मात्र याचा इन्कार केला असून आपल्याकडे अशा प्रकारची कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. याविषयी दिग्विजय म्हणाले, ‘‘तो आरटीआय कार्यकर्ताच आपल्याकडे अशी आकडेवारी नसल्याचे सांगत असेल, तर मोदींनी ती कोणत्या वृत्तपत्रात वाचली. त्यांना ज्या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली तिचे नाव मोदींनी जाहीर करावे.’’
संघाकडून आपल्या प्रशिक्षणार्थीना चुकीची माहिती पुरवून नाझी प्रणालीनुसार प्रशिक्षण दिले जाते. मोदी हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळेच ते खोटे आरोप करून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या विषयाचे राजकारण करत आहेत. – दिग्विजय सिंह