मी आनंदाने कर्णधारपद सोडेन या महेंद्रसिंह धोनीच्या वक्तव्यावर माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली – माझ्या कर्णधारपद सोडण्याने भारतीय क्रिकेट संघ सामने जिंकणार असेल तर, मी आनंदाने कर्णधारपद सोडेन या महेंद्रसिंह धोनीच्या वक्तव्यावर माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी जोरदार टीका केली आहे.
बांगलादेशकडून झालेल्या पराभवाने धोनी बिथरला असून, त्याला योगसाधनेची आवश्यकता आहे असे मत बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले.
पहिल्यांदाच धोनीने अशा प्रकारचे निरर्थक विधान केले आहे यावरुन तो आता शांत, संयमी कर्णधार राहिला नसल्याचे स्पष्ट होते. त्याने या कठिण काळातून बाहेर येण्यासाठी योगसाधनेचा आधार घ्यावा असे मत स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिध्द असलेल्या बेदींनी व्यक्त केले.
मी पराभवाची जबाबदारी कोणा एकावर न ढकलता संपूर्ण संघाला यासाठी जबाबदार धरेन असे बेदी यांनी सांगितले. रविवारी रात्री बांगलादेशने दुसरा सामना सहा गडी राखून जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
त्यानंतर धोनीने प्रसारमाध्यमांशी बोलताना माझ्या कर्णधारपद सोडण्याने भारतीय क्रिकेट संघ सामने जिंकणार असेल तर, मी आनंदाने कर्णधारपद सोडेन असे विधान केले होते.
यापूर्वी धोनीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानावर धाव घेताना अडथळा आणणा-या मुस्तफीझूर रहमानला हाताच्या कोपराने ढकलून बाजूला केले होते. त्यासाठी सामनाधिका-यांनी धोनीला सामन्याच्या मानधनातून ७५ टक्के रक्कम कापून घेण्याचा दंड ठोठावला होता. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणार धोनी पहिल्यांदाच मैदानावर आक्रमक झालेला पहायला मिळाला. धोनीच्या या कृतीवरही बेदी यांनी टीका केली.