ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला वर्ष उलटूनही मारेक-यांचा शोध लागलेला नाही.
मुंबई- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला वर्ष उलटूनही मारेक-यांचा शोध लागलेला नाही. हत्येच्या तपासात जाणीवपूर्वक विलंब होत असून अटक केलेला एकमेव आरोपी समीर गायकवाडला वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सभागृहात केला.
कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या तपासात प्रगती होत नसल्याबद्दल न्यायालयाने व्यक्त केलेली नाराजी व ओढलेल्या ताशे-यांचा मुद्दा मुंडे यांनी २८९ अन्वये उपस्थित केला होता. यासंदर्भात मुंडे म्हणाले, पोलिसांकडून आरोपी समीर गायकवाडची चौकशी योग्य पद्धतीने होत नाही आहे.
न्यायालयाकडून वेळ वाढवून मिळूनही तपासात प्रगती नाही. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात टाळाटाळ होत आहे. चौकशीविनाच आरोपपत्र दाखल करण्याची घाई सुरू आहे. यामुळे सरकार आरोपी गायकवाडला पाठीशी घालत आहे, अशी लोकभावना झाली असून त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही मुंडे यांनी दिला.