बहुचर्चित जादूटोणाविरोधी वटहुकूम जारी झाल्यानंतर नांदेडमध्ये या कायद्यांतर्गत पहिली कारवाई करण्यात आली.
नांदेड– बहुचर्चित जादूटोणाविरोधी वटहुकूम जारी झाल्यानंतर नांदेडमध्ये या कायद्यांतर्गत पहिली कारवाई करण्यात आली. बुवाबाजी करणा-या दोन भोंदू बाबांना नांदेड पोलिसांनी अटक केली. हे भोंदूबाबा उत्तर प्रदेशमधील असून त्यांनी नांदेडमध्ये आपली अंधश्रद्धेची दुकाने थाटली होती. सर्वप्रकारच्या दुर्धर आजारांवर गंडा, ताविज याद्वारे उपचार करण्याचा दावा करीत हे भोंदूबाबा नांदेडकरांना अंधश्रद्धेचा गंडा घालत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्वत:च सापळा रचून या भोंदूबाबांना अटक केली.
२६ ऑगस्ट रोजी राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर जादूटोणाविरोधी वटहुकुमाचे कायद्यात रूपांतर झाले. या कायद्यांतर्गत नांदेड पोलिसांनी पहिली कारवाई केली. साहिल खान लीयाकत आणि अमिरोद्दीन लतिफ या उत्तर प्रदेशमध्ये राहणा-या दोघांनी नांदेडमध्ये अंधश्रद्धेचे दुकान थाटले होते. वर्तमानपत्रात जाहिरात देऊन हे भोंदूबाबा आपले सावज हेरत. एड्स, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर उपचार, गृहक्लेश, लग्नात समस्या अशा विविध समस्यांवर सर्वावर आव्हान देऊन उपचार अशी जाहिरात करून ते लोकांना आकर्षित करत होते. लोकही या अंधश्रद्धेला बळी पडत होते. याची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी या भोंदूबाबांकडे पोलिसालाच रुग्ण म्हणून पाठवले. भोंदूबाबाने मंत्रतंत्र, गंडे देताच पोलिसांनी या दोन्ही भोंदूबाबांना अटक केली.
या बाबांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनीही जादूटोणा असा काही प्रकार अस्तित्वात नसल्याचे मान्य केले. आपण अंधश्रद्धाळू लोकांना फसवत असल्याचेही दोघांनी मान्य केले. हे भोंदूबाबा जादूटोण्याचे ढोंग उत्कृष्ठरीत्या रचत असत. त्यासाठी त्याने सगळ्या प्रकारचे साहित्य जमवले होते. त्याच्या थापांना अनेक जण बळी पडल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिसंच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत होत आहे.