बोगस पदवी प्रकरण, शालेय कंत्राटाचा १९१ कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचे आरोप असलेले शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे पुन्हा नव्या प्रकरणात विरोधकांच्या कचाटय़ात सापडले आहेत.
मुंबई – बोगस पदवी प्रकरण, शालेय कंत्राटाचा १९१ कोटी रुपयांच्या घोटाळय़ाचे आरोप असलेले शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे पुन्हा नव्या प्रकरणात विरोधकांच्या कचाटय़ात सापडले आहेत. मंत्रीपदावर असताना विनोद तावडे खासगी ६ कंपन्याचे संचालक आहेत. तसेच त्यांच्या नावाचे ३ डीन नंबर असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने ६ डीन नंबर असल्याचा गंभीर आरोप कॉँग्रेसने केला. या दोन्ही नेत्यांनी स्वत:ची माहिती लपवली असून मंत्र्यांसाठी असलेल्या आचारसंहितेचा भंग केला आहे. हा गंभीर गुन्हा असल्याने तावडे आणि गडकरी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संयुक्तरित्या येथे केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. त्यावर गुरुवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न तावडे यांनी केला. मात्र, तावडे यांनी दिलेल्या उत्तराचा दाखला घेऊन काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तावडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत.
श्री मल्टीमीडिया व्हिजन लिमिटेड कंपनीच्या दैनिक मुंबई तरुण भारतमध्ये भाजपाने २५ लाख रुपये ट्रेड इन्वेस्टमेंट म्हणून गेली १५ वष्रे ठेवलेले आहेत. हा खूप मोठा घोटाळा आहे. या कंपनीत नितीन गडकरी व विनोद तावडे संचालक आहेत. ‘मी मानद संचालक असल्याचे तावडे यांनी सांगितले. एखादा मानद संचालक कंपनीच्या ताळेबंदावर कशा स्वाक्ष-या करू शकतो, असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला आहे. मानद संचालक हे पद ठेवणेच कंपनी कायद्यात नाही.
मंत्री झाल्यावर ६० दिवसात इतर कंपन्यांमध्ये भागीदार अथवा संचालक असल्यास त्याचा राजीनामा देणे संबंधित मंत्र्याला बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्थावर आणि जंगम मालमत्ता दाखवणे बंधनकारक आहे. परंतु शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सगळी माहिती दडवली आहे. ती लपवल्यास तो मोठा गंभीर गुन्हा आहे. लोकप्रतिनिधी कायद्याच्या १२५/अ नुसार ६ महिन्याची शिक्षा आणि दंड किंवा दोन्हीही होऊ शकते. तावडे हे श्री मल्टीमीडिया व्हिजन लिमिटेडबरोबरच अन्य ६ खासगी कंपन्यांमध्ये संचालक असल्याचा आरोप निरुपम यांनी कंपनीच्या नावासह केला आहे. तावडे यांचा आणखी एक घोटाळा व फसवणूक निरुपम यांनी उजेडात आणली.
कायद्यानुसार एका व्यक्तीच्या नावावर एकच डायरेक्टर अॅडन्टीफाय नंबर (डीन) नंबर असतो. मात्र तावडे यांच्या नावावर ३ डीन नंबर असल्याचा गंभीर आरोप निरुपम यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही खासगी कंपन्यांवर संचालक असून त्यांच्याकडे ६ वेगवेगळय़ा क्रमांकाचे डीन नंबर असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री विनोद तावडे व नितीन गडकरी या दोघांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे.
दोन्ही मंत्र्यांविरोधात कायदेशीर लढाई लढणार
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी नैतिकतेच्या गप्पा करतात. तेव्हा त्यांनी त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकले पाहिजे. या दोन्ही मंत्र्यांविरोधात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून कायदेशीर लढाई सुरू करणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
तावडे हे श्री मल्टीमीडिया कंपनीप्रमाणेच श्रीरंग प्रिंटर्स, तावडे-नलावडे बिल्डवेल, नाशिक मरीन फीड्स, इंनोवेटिव्ह ऑफशोरिंग व महाराष्ट्र फिल्म स्टेज अॅण्ड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या ६ कंपन्यांवर संचालक आहेत.