देशातील पहिले ‘कोरल गार्डन’ गुजरातच्या मिठापूर किनारी प्रदेशातील देवभूमी-द्वारका जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.
गांधीनगर- देशातील पहिले ‘कोरल गार्डन’ गुजरातच्या मिठापूर किनारी प्रदेशातील देवभूमी-द्वारका जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. कोरलच्या प्रजाती वाचवण्यासाठी तसेच राज्याच्या पर्यटनाला बळ देण्यासाठी कोरलच्या अनेक प्रजाती एका ठिकाणी जमा करून हे गार्डन उभारण्यात येत आहे.
आम्ही मिठापूर किनारी प्रदेशात कोरलच्या प्रजाती वाचवण्यासाठी गार्डन उभारत आहोत. पहिल्या कोरल गार्डन उभारणीसाठी भारतीय वाइल्डलाइफ संस्था आणि टाटा केमिकल लिमिटेड यांच्यात सामंजस्य करारावर सह्या झाल्या आहेत, अशी माहिती वाइल्डलाइफ संस्थेचे वरिष्ठ सल्लागार बी. सी. चौधरी यांनी दिली. या प्रकल्पासाठी गुजरात वनविभाग निधी देणार आहे. त्यानुसार वाइल्डलाइफ संस्था राज्याशी व्यापक सामंजस्य करार करणार आहे असेही, ते म्हणाले. हा प्रकल्पाची संकल्पना २००६ मध्ये प्रथम पुढे आली, वाइल्डलाइफ संस्थेने सुरुवातीला कोरलच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी केलेले प्रयोग यशस्वी झाल्यानंतर कोरल गार्डन निर्मितीचा प्रस्ताव पुढे आला.
प्रकल्पाच्या योजनेनुसार, विविध विभागांची निर्मिती केली जाईल, त्यानंतर जवळपास सर्वच कोरल प्रजाती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात येतील. मिठापूर कोरल गार्डनही त्यापैकीच एक असेल जिथे कच्छच्या आखातातील विविध कोरल प्रजाती उपलब्ध होतील, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. पर्यटकांना कोरलचे सौंदर्य पाहता येण्यासाठी पाणबुडी, जेट्टी आणि बोटींचीही व्यवस्था करण्यात येणार आहे, असे शिवाय पूल, जेट्टी आणि बोटींचीही व्यवस्था करण्याचा मानस अधिका-यांनी वर्तवला आहे.
भारतीय वाइल्डलाइफ संस्थेच्या क्षेत्र अधिकारी सुबुरामन म्हणाले, देशातील पहिलेवहिले कोरल गार्डन उभारण्याची ही चांगली संधी असून, हा प्रकल्प कोरलच्या प्रजाती वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. हा प्रकल्प वाइल्डलाइफ संस्था आणि गुजरात वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने उभारला जाईल आणि टाटा केमिकल लिमिटेड निधी पुरवणारी कंपनी असेल असेही ते म्हणाले.