‘देव तारी त्याला कोण मारी’, नशीब बलवत्तर असेल तर मदतीला कोणीही धावून येतोच. याची अनुभूती आली ती सावंतवाडीत.
सावंतवाडी- ‘देव तारी त्याला कोण मारी’, नशीब बलवत्तर असेल तर मदतीला कोणीही धावून येतोच. याची अनुभूती आली ती सावंतवाडीत. मोती तलावाकाठी बसलेल्या बाबू घाडगे यांचा तोल गेल्याने ते तलावात पडले. मात्र, तेथे दोन पोलीस देवदुताप्रमाणे आले आणि त्यांनी या वयोवृद्धाचे प्राण वाचविले. दरम्यान, बाबू घाडगे यांच्याबाबतीत या घडलेल्या घटनेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
विद्याधर राणे व पोलीस नाईक, किरण कांबळे हे त्यांच्याबाबतीत खाकीतील देवदूतच ठरले. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजता घडली. बाबू घाडगे (४९, मूळ रा. गडहिंग्लज, सध्या सावंतवाडी) हे गवंडी काम करतात.
मंगळवारी बाजाराचा दिवस असल्याने त्यांना रजा असल्याने ते सकाळी मोती तलावाकाठी बसले असता अचानक त्यांचा तोल गेल्याने ते तळयात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात गटांगळया खाऊ लागले. तळयाच्या काठी बघ्यांची गर्दी होती. मात्र, पाण्यात उतरून त्यांना वाचविण्यासाठी कोणीही धजावला नाही.
सावंतवाडी न. प.समोर डय़ुटीवर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विद्याधर राणे व किरण कांबळे यांनी तळयाकाठीचा जमाव दूरवरून पाहिला. काहीतरी अघटित घडले असल्याच्या संशयावरून या दोन्ही पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तळयात वाकून पाहिले असता एक वयोवृद्ध इसम पाण्यात गटांगळया खात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मागचा-पुढचा विचार न करता या दोन्ही पोलीस कर्मचा-यांनी कर्तव्य व माणुसकीची जाणीव ठेऊन तळयाकाठी असलेली बोट सुरू केली. पाण्यात बुडत असलेल्या बाबू घाडगेपर्यंत ते पोहोचले व अथक प्रयत्नाअंती या दोघांनीही घाडगेंना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.
दरम्यान, या दोन्ही पोलीस कर्मचा-यांना खाकीतील असलेल्या माणुसकीचे दर्शन घडवून आणले. किंबहुना हे दोघेही बाबू घाडगे यांच्यासाठी ख-या अर्थाने देवदूतच ठरले. त्यांच्या या साहसाबद्दल शहरवासीयांमधून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.