बाल गंधर्व यांनी अजरामर केलेल्या अनेक नाटय़पदांचे सादरीकरण करून आनंद भाटे तथा आनंद गंधर्व यांनी देवरूख येथील शास्त्रीय सुगम संगीत मैफल संस्मरणीय केली.
देवरूख – बाल गंधर्व यांनी अजरामर केलेल्या अनेक नाटय़पदांचे सादरीकरण करून आनंद भाटे तथा आनंद गंधर्व यांनी देवरूख येथील शास्त्रीय सुगम संगीत मैफल संस्मरणीय केली. या मैफलीत त्यांनी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर केले. तब्बल साडेतीन तास मैफल रसिकांच्या उदंड प्रतिसादात रंगली.
शहरातील गणेश वेदपाठशाळेच्या १६व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ही मैफल घेण्यात आली. शाळेच्या कात्रे-चांदोरकर सभागृहात या मैफलीचा प्रारंभ भाटे यांनी ‘पुरिया कल्याण’ या रागातील विलंबित एकताल व द्रुत तीन तालात बंदिशी सादर करून केला. यानंतर ‘संगीत मानापमान’ नाटकातील छोटा गंधर्व यांनी गायलेले ‘दे आता या शरणांगता’ हे पद आळवले.
बाल गंधर्व यांनी अजरामर केलेले ‘स्वयंवर’ नाटकातील ‘नरवर कृष्णा समान’ हे पद गायले. ‘संगीत सौभद्र’ नाटकातील बाल गंधर्वाचे ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे गीतही साकारले. नेहमीच रसिकांच्या ओठावर रेंगाळणा-या या पदांच्या सादरीकरणाने रसिक खूश झाले. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘संत तुलसीदास’ या नाटकातील ‘राम रंगी रंगले मन’ ही रचना श्री. भाटे यांनी सादर केली.
पंडितजींच्या संतवाणीतील श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला ‘भाव तोची देव’ अभंग आळवला. ‘याजसाठी केला होता अट्टहास’ हे पद व ‘संगीत मानापमान’ नाटकातील छोटा गंधर्व यांचे ‘या नव नवल नय नोचना’ हे पद साकारले. बाल गंधर्वाच्या नाटकातील दु:खदप्रसंगी चित्रित केलेले व गायलेले ‘नाही मी बोलत नाथा’ हे पदही भाटे यांनी सादर केले. यानंतर ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग, ‘जोहार माय बाप जोहार’ ही पदे आळवली.
या मैफलीची सांगता ‘संशयकल्लोळ’ नाटकातील ‘चिन्मया सकल हृदय’ या नाटय़पदाने केली. या मैफलीला तबला साथ हेरंब जोगळेकर यांची तर संवादिनी साथ मधुसूदन लेले यांची लाभली. साडेतीन तास सुरू राहिलेली ही मैफल उत्तरोत्तर थंडीच्या कडाक्यातही रंगत होती. मैफलीला जिल्हाभरातील रसिक उपस्थित होते.