तालुक्यातील १८ गावाचे आराध्य दैवत देवपूर येथील कोंडजाई वाघजाई देवीची जत्रा देवकाठय़ांच्या प्रदक्षिणेने पार पडली.
पोलादपूर – तालुक्यातील १८ गावाचे आराध्य दैवत देवपूर येथील कोंडजाई वाघजाई देवीची जत्रा देवकाठय़ांच्या प्रदक्षिणेने पार पडली. रंगीबेरंगी रेशमी कापडांनी आणी विद्युत रोषणाईने मढविलेल्या देवकाठया रणहालगीच्या ढोलताशांच्या गजरात, ग्रामदैवतांचे चांगभलं, वाजत -गाजत नाचवित जत्रेत दाखल होताच कोकणातील परंपरा संस्कृतीचे दर्शन घडवित होत्या.
अति दुर्गम भागात देवपूर गावाच्या हद्दीतील दोन नद्यांच्या संगमावर टेकडीवजा पठारावर निसर्गरम्य असे कोंडाजाई वाघजाई देवीचे स्वयंभू पुरातन जागृत देवस्थान आहे. दोनशे वर्षाहून अधिक वारसा लाभलेल्या या ऐतिहासिक देवस्थानाला ब्रिटीश काळात ईनाम होते. परंपरेने चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या व वद्य द्वितीय तिर्थाला कोंडजाई वाघजाई देवीची जत्रा भरवली जात आहे. रात्री गांजवणे, खडपी, चोळई, फणसकोंड, बागवाडी, धामणदेवी, चोळई, कोंढवी या आठगावांची ग्रामदैवत असलेल्या काळभैरीची मानाची पालखी व देवकाठी जत्रेत दाखल झाल्यानंतर परिसरातील पांगळोली भोगाव खुर्द, भोगाव बुद्रुक, गोळेगणी, कोतवाल, कुडपण, पळचिल, परसुळ, क्षेत्रपाळ, ओंबळी, कातळी, पैठण या गावांच्या देवकाठय़ा एकापाठोपाठ नाचवित वाजत गाजत उशिरापर्यंत दाखल होतात.
पहाटे साडेपाचच्या दरम्यान बगाडाचा कार्यक्रम झाल्यानंतर देवकाठया प्रदक्षिणेला निघतात. मंदिराभोवती प्रदक्षिणा झाल्यावर जत्रेची सांगता होते. माणगाव, महाड, खेड तालुक्यातील तसेच मुंबई, पुणे. ठाणे येथे वास्तव्यास असलेले चाकरमानी कुटुंबासह मोठया प्रमाणावर देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावर्षी पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांग लागली होती.
तंटे-बखेडे मंदिरात मिटवले जातात
कोंडजाई वाघजाई देवीच्या जत्रेतील बगाड कार्यक्रम हा एकमेव व वैशिष्टय़ असे आहे की, देवीच्या पुजेचा मान देवपूर गावच्या महाडीक घराण्याकडे पिढयांपिढ्या चालत आला आहे. नवसास पावणारी हाकेला धावणारी देवीची ख्याती आहे. तालुक्यातील गावागावातील न मिटलेले वाद तंटे बखेडे या देवीच्या मंदिरात बहुजन समाज एकत्रित येऊन मिटवित असतो.