आगामी देवधर चषक स्पर्धेत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि यष्टिरक्षक, फलंदाज पार्थिव पटेलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नवी दिल्ली- आगामी देवधर चषक स्पर्धेत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि यष्टिरक्षक, फलंदाज पार्थिव पटेलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईकर रोहित इंडिया ब्लू तसेच गुजरातचा पार्थिव इंडिया रेडचे नेतृत्व करेल. या स्पर्धेतील तिसरा संघ हा विजय हजारे चषक विजेता तामिळनाडू असेल.
मांडीच्या दुखापतीमुळे रोहित तब्बल महिनाभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकला. विजय हजारे चषक स्पर्धेत मुंबईतर्फे तो दोन सामने खेळला. मात्र रोहितला (४ आणि १६) अपेक्षित कामगिरी करता आली नाही. देवधर ट्रॉफीमध्ये खेळ उंचावून त्याला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करण्याची संधी आहे. रोहितच्या कर्णधारपदाखालील इंडिया ब्लू संघात ऑफस्पिनर हरभजन सिंगसह नवोदित श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), मनोज तिवारी तसेच मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरचा समावेश आहे.
इंडिया रेडमध्ये डावखुरा सलामीवीर शिखर धवनला संधी देण्यात आली आहे. त्याच्यासह मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज केदार जाधव तसेच मनीष पांडे, अक्षर पटेल आणि धवल कुलकर्णीचा संघात समावेश आहे. देवधर चषक स्पर्धेला २५ मार्चपासून सुरुवात होईल. अंतिम लढत २९ माचला खेळवली जाईल. ही स्पर्धा विशाखापट्टनमला रंगेल.
इंडिया ब्लू संघ : रोहित शर्मा (कर्णधार), मनदीप सिंग, श्रेयस अय्यर, अंबाती रायुडू, मनोज तिवारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक हुडा, हरभजन सिंग, कृणाल पंडय़ा, शाहबाझ नदीम, सिद्धार्थ कौल, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा, पंकज राव.
इंडिया रेड संघ : पार्थिव पटेल (कर्णधार/यष्टिरक्षक), शिखर धवन, मनीष पांडे, मयांक अगरवाल, केदार जाधव, इशांक जग्गी, गुरकीरत मान, अक्षर पटेल, अक्षय कर्नेवर, अशोक डिंडा, धवल कुलकर्णी, कुलवंत खेजरोलिया, गोविंदा पोद्दार.