समाजातील दृष्टिहीन बांधवांमध्ये असणा-या कलेला, सुप्त गुणांना विकसित करण्यासाठी ‘दी नॅब वर्कशॉप फॉर दी ब्लाईंड’ ही शासन मान्यताप्राप्त संस्था कार्यरत आहे.
मुंबई- समाजातील दृष्टिहीन बांधवांमध्ये असणा-या कलेला, सुप्त गुणांना विकसित करण्यासाठी ‘दी नॅब वर्कशॉप फॉर दी ब्लाईंड’ ही शासन मान्यताप्राप्त संस्था कार्यरत आहे. अपंगत्वावर मात करत, त्यांना सक्षम बनवत समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम, कार्यशाळा राबविल्या जात असून एका प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. ‘टर्नर ऑपरेटर कोर्स’, ‘इलेक्ट्रिक मोटर रिवाईंडिंग’ आणि ‘औद्योगिक प्रशिक्षण’ या तीन विषयांवर आधारित प्रशिक्षण दिले जाणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
दृष्टिहीन बांधवांसाठी रोजगार मिळवणे चिंतेची बाब झाली आहे. मात्र कोणतेही शारीरिक अपंगत्व रोजगार मिळवण्यासाठी अडथळा ठरू शकत नाही, हा उद्देश समोर ठेवत ‘नॅब वर्कशॉप’च्या वतीने प्रशिक्षण उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. ३० ते ३५ वयोमर्यादेपर्यंतच्या व्यक्तींसाठी हा प्रशिक्षण उपक्रम खुला आहे. ‘टर्नर ऑपरेटर कोर्स’ आणि ‘इलेक्ट्रिक मोटर रिवाईंडिंग’चा प्रशिक्षण कालावधी ६ महिने असून सदर प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे ७वी उत्तीर्ण आवश्यक असून ब्रेललिपीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ‘टर्नर ऑपरेटर’ कोर्सची मुलाखत पुढील वर्षी १४ जानेवारी रोजी घेतली जाणार असून ‘इलेक्ट्रिक मोटर रिवाईंडिंग’ कोर्सची मुलाखत १५ जानेवारी रोजी घेतली जाईल. ‘औद्योगिक प्रशिक्षण’ कोर्सचा कालावधी २ वर्षे असून दर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुलाखत घेतली जाईल.
इच्छुकांनी या अभ्यासक्रमासाठी १ जानेवारीपर्यंत व्यव. अधीक्षक, दी नॅब वर्कशॉप फॉर दी ब्लाईंड, जुन्या पासपोर्ट कार्यालयासमोर, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी या पत्त्यावर प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. स्वयंरोजगाराच्या किंवा रोजगाराच्या माध्यमातून प्रौढ दृष्टिहिनांना प्रशिक्षण देत त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम, कार्यशाळा राबविल्या जात असतात. अभ्यासासोबत वार्षिक सहल, खेळ, सांस्कृतिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आतापर्यंत २ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून अनेक जण स्वयंरोजगार करत आहेत. स्टेनोग्राफी, टेलिफोन ऑपरेटर, मसाज आदीचे प्रशिक्षण दिले जात असून रोजगाराच्या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शनही केले जात असल्याचे, ‘दी नॅब वर्कशॉप फॉर दी ब्लाईंड’चे डेव्हलपमेंट ऑफिसर मुरलीधरन यांनी सांगितले. प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्टय़ा खंबीर व्हावे यासाठी मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्रज्ञ विभागाच्या प्राधापकांच्या वतीने विशेष कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. आपण अपंग आहोत, समाजावर ओझे आहोत, हतबल आहोत हा विचार दृष्टिहीन बांधवांच्या मनातून काढून टाकणे हा कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे.
सामान्य व्यक्तींप्रमाणचे आपणही स्वावलंबी बनू शकतो, प्रत्येकासारखे जीवन जगू शकतो हा विचार, आत्मविश्वास दृष्टिहीन किंवा अपंगत्व असलेल्या व्यक्तींमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून हा आत्मविश्वास त्यांच्यात निश्चितच निर्माण होतो. त्यांनी मानसिकदृष्टय़ाही तितकेच सक्षम आणि खंबीर व्हावे यासाठी विविध विषयांबाबत आम्ही त्यांचे समुपदेशन करतो. विद्यापीठातील विद्यार्थ्यांचाही या कार्यशाळेत सहभाग असतो. – डॉ. गौतम गवळी, प्राध्यापक, मानसशास्त्रज्ञ विभाग, मुंबई विद्यापीठ