महापालिकेत प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून परिवर्तनासाठी रविवारी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात मुंबईकर कोकणवासीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई- महापालिकेत प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून परिवर्तनासाठी रविवारी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात मुंबईकर कोकणवासीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, काँग्रेसचे आमदार नितेश राणे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांच्यासह कोकणातील अनेक नेते मार्गदर्शन करणार आहेत.
विलेपार्ले पूर्व येथील दीनानाथ नाट्यगृह येथे रविवार ८ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ७ या वेळेत कोकणवासीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मध्य, पूर्व आणि पश्चिम मुंबईत कोकणी माणसांचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे त्या भागात स्नेहसंमेलने आयोजित केली जाणार आहेत.
या मेळाव्यांना गावाकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तसेच कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी उपस्थित राहून मुंबई महापालिकेत परिवर्तन घडविण्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत.