नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्यास आपल्याला बिल्कूल स्वारस्य नाही असे स्पष्ट करत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी संभाव्य समावेशाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
पणजी- नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्यास आपल्याला बिल्कूल स्वारस्य नाही, तथापी केंद्रात आपली जर गरज भासली तर त्यासाठी आपण तात्काळ उपलब्ध असू, असे स्पष्ट विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राष्ट्रीय राजधानीतील वृत्तपत्रांशी करून केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांच्या संभाव्य समावेशाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील गोवा प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने भावी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांची नवी दिल्लीत भेट घेतली. नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे जबर आव्हान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहे. त्यासाठी त्यांना थोडा अवधी आणि पुरेशी मोकळीक देणे उचित ठरणार असल्याचे पर्रिकर यांनी नवी दिल्लीतील प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
आपल्याला मंत्रिमंडळात सहभागी होण्यास अजिबात स्वारस्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला तथापि, सलग चार वेळा उत्तर गोव्यातून खासदार म्हणून निवडून आलेल्या आणि मागील वाजपेयी मंत्रिमंडळात विविध खात्यांची मंत्रीपदे भूषवलेल्या श्रीपाद नाईक यांचा मंत्रिमंडळात निश्चित सहभाग होईल, असा विश्वासही पर्रिकर यांनी व्यक्त केला.