बनावट पदवी प्रमाणपत्राप्रकरणी आम आदमी पक्षाचे कायदा मंत्री जिंतेंदर सिंग तोमर यांंच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे
नवी दिल्ली – बनावट पदवी प्रमाणपत्राप्रकरणी आम आदमी पक्षाचे कायदा मंत्री जिंतेंदर सिंग तोमर यांंच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. तोमर यांनी पदावरुन पायउतार व्हावे अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान अर्ज दाखल करताना तोमर यांनी कायद्याच्या पदवीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
तोमर यांची मंत्रीपद तसेच आमदारपदावरुन तात्काळ हकालपट्टी कऱण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
तोमर ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्या मतदारसंघातून कोणी प्रतिनिधित्व करावे हे लोकांना ठरवू दे असे दिल्ली काँग्रेस प्रमुख अजय माकन यांनी सांगितले. तर हे प्रकरण लज्जास्पद असल्याची टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी.सी. चाको यांनी केली आहे.
केजरीवाल यांनी तोमर यांना राजीनामा देण्यास सांगावे अथवा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी. दिल्ली सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे, असे चाको म्हणाले.
बिहारच्या तिलक मांजी भागलपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्याचा दावा तोमर करत आहे. मात्र याच विद्यापीठाने तोमर यांच्याकडे बनावट प्रमाणपत्र असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे.
या विद्यापीठाने यासंबंधीचा तपास अहवाल न्यायालयात सादर करताना तोमर यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रावर जो सिरियल नंबर आहे त्याक्रमांकासमोर तोमर यांचे नाव नसून दुस-या कोणाचेतरी असल्याचे म्हटले आहे. तोमर यांच्या पदवीच्या प्रमाणपत्राची विद्यापीठाकडे कोणतीही नोंद नसल्याचे विद्यापीठाने न्यायालयात सांगितले आहे.
दरम्यान, बनावट प्रमाणपत्राप्रकरणी विरोधी पक्षांकडून केले जाणारे सर्व आरोप तोमर यांनी फेटाळून लावले आहेत. ‘आप’ची प्रतिमा मलीन करण्याचा भाजपाचा डाव असल्याचे तोमर यांनी म्हटले आहे. माझ्याकडे असलेले प्रमाणपत्र खरे आहे. जेव्हा सर्व अहवाल न्यायालयात सादर होतील तेव्हा खरे सर्वांसमोर उघड होईल. दूध का दूध और पानी का पानी हो जायेगा असे तोमर म्हणाले.