आज पहिल्या सामन्यात कोलकाता व दिल्ली आणि दुस-या लढतीत पंजाबची गाठ गतविजेता हैदराबादशी पडेल.
कोलकाता/मोहाली- आयपीएल-१०मधील शुक्रवारी (२८ एप्रिल) होणा-या लढतींमध्ये पहिल्या सामन्यात ईडन गार्डन्सवर माजी कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली डेअरडेव्हिल्सशी दोन हात करेल. दुस-या लढतीत पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (पीसीए) किंग्ज इलेवन पंजाबची गाठ गतविजेता हैदराबाद सनरायझर्सशी पडेल.
कोलकात्याने आठ सामन्यांत सहा सामने (१२ विजय) जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. वास्तविक पाहता माजी विजेता मुंबई इंडियन्सचेही तितकेच गुण आहेत. मात्र सरस ‘रनरेट’वर गौतम गंभीर आणि सहका-यांनी आघाडी घेतली आहे.
यजमानांच्या तुलनेत प्रतिस्पर्धी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या कामगिरीच्या तुलनेत खूप फरक आहे. ६ सामन्यांतून केवळ २ विजय (४ गुण) मिळवणारा झहीर खानचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. कोलकात्याला दुस-यांदा विजयी हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे.
मात्र दिल्लीसमोर सलग चौथा पराभव टाळण्याचे आव्हान आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोलकात्याला आणखी एक विजय मिळवण्याची संधी आहे. बहरलेली आघाडीची फळी आणि गोलंदाजांचे सातत्य कोलकात्याच्या उंचावलेल्या कामगिरीचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले आहे. दुसरीकडे, दिल्लीला सर्वच आघाडय़ांवर सुधारणा आवश्यक आहे.
गतविजेता सनरायझर्स हैदराबादची कामगिरी संमिश्र आहे. ८ सामन्यांत चार विजयांसह (९ गुण) त्यांनी गुणतालिकेत तिसरे स्थान राखले आहे. किंग्ज इलेवन पंजाबला ७ सामन्यांतून ३ विजय (६ गुण) मिळवता आलेत. गुणतालिकेत ते पाचव्या स्थानी आहेत.
बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याचा फटका डेव्हिड वॉर्नर आणि सहका-यांना बसला आहे. त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यामुळे पंजाबला हरवून अव्वल चार संघांतील स्थान आणखी मजबूत करण्याला हैदराबादचे प्राधान्य राहिल.
पंजाब संघ ७ सामन्यांतून ३ विजयांसह (६ गुण) पाचव्या स्थानी आहे. हैदराबादविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा त्यांना मिळू शकेल. मागील लढतीत गुजरातला हरवून पंजाबने चार पराभवांची मालिका खंडित केली. सातत्य राखताना गुणतालिकेत वरचे स्थान मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
कोलकाता वि. दिल्ली
वेळ : सायं. ४ वा.
पंजाब वि. हैदराबाद
वेळ : रा. ८ वा.