ज्या वाहनचालकांकडे पीयुसी प्रमाणपत्र असेल त्यांनाच पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.
नवी दिल्ली- दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने कठोर पाऊले उचलली असून दिल्लीत सर्व पेट्रोल पंपावर ज्या वाहनचालकांकडे पीयुसी प्रमाणपत्र (पोल्युशन अंडर कंट्रोल) असेल त्यांनाच पेट्रोल आणि डिझेल देण्यात येणार आहे.
दिल्लीचे मुख्य सचिव एस. के. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एक उच्च अधिका-यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्राथमिक स्तरावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दिल्ली सर्वात प्रदूषित शहर असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे मे २०१४ मध्ये उपराज्यपालांनी उच्चाधिकार असणा-या एका समितीची स्थापना केली होती. या समितीने पीयुसी प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा हा उपाय सुचवला आहे. त्यावर या बैठकीत अनुमोदन देऊन या निर्णयाची अमलबजावणी करण्याचे ठरल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.
दिल्ली सरकार प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखत आहे. त्यानुसार ही योजना पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी दोन महिने लागतील, असा अंदाज श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. मात्र या दरम्यान, लोकांमध्ये जनजागृती करणे, पीयुसी नसल्यास इंधन मिळणार नाही, हे त्यांना समजावणे तसेच पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांना पीयुसी प्रमाणपत्र तपासण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दिल्लीमध्ये एकूण पेट्रोल पंपांची संख्या ४०० असून त्यातील २५० पंपांना परिवहन विभागाने पीयुसी प्रमाणपत्र यापूर्वीच दिले आहे. प्रदूषण टाळण्यासाठी उर्वरीत १५० पेट्रोल पंपांनाही पीयुसी सर्टिफिकेट अनिवार्य करण्याची मागणी तेल कंपन्यांनी केली आहे.