दिल्लीत विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्तेच्या चाव्या आम आदमी पक्षाकडे राहण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली – दिल्लीत विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्तेच्या चाव्या आम आदमी पक्षाकडे राहण्याची शक्यता आहे. महागाई, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आणि पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव या मुद्यांवर लढवल्या गेलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत जनतेने काँग्रेसला सपशेल नाकारले आहे. दिल्ली विधानसभेची मुदत १८ डिसेंबर रोजी संपत असल्यामुळे नव्या सरकारला त्याआधी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. भाजपने सर्वाधीक जागांवर विजय मिळवला असला तरी त्यांना बहुमतासाठी पाच जागांची गरज आहे.
दिल्लीत कोणता पक्ष आघाडीवर, कोणाला किती जागा पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मागच्या निवडणूकीत सर्वाधिक ४३ जागा जिंकणा-या काँग्रेसला या निवडणूकीत दोन आकडी जागांपर्यंत मजल मारणेही शक्य झालेले नाही. भाजपने ३१ तर, ‘आप’ने २८ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला फक्त आठ जागा जिंकता आल्या आहेत. निवडणुकीत जनता दल (संयु्क्त), शिरोमणी अकाली दल आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एक जागांवर विजय मिळवला आहे.
दिल्लीत काँग्रेस थेट तिस-या क्रमाकांवर असून, नव्याने आलेला आम आदमी पार्टीला मोठे यश मिळाले आहे.
दिल्लीत भाजप मोठा पक्ष ठरणार असला तरी, भाजपला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याने दिल्लीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपला पाठिंब्यासाठी ‘आप’वर अवलंबून रहावे लागणार आहे. सध्या तरी आपने आपण कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तब्बल २२ हजार मतांनी पराभव केला. तर ‘आप’चे दुसरे नेते मनिष सिसोदीयाही विजयी झाले आहेत.
दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पराभव मान्य केला असून, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवून दिला आहे.
दोन वर्षांपूर्वी लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत झालेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आम आदमी पक्षाला फायदा झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे तर, धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळेही दिल्लीत मोठया प्रमाणावर जनमत काँग्रेसच्या विरोधात गेल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्ष वर्धन क्रिष्णानगर विधानसभा मतदारसंघातून पाचहजार मतांनी आघाडीवर आहेत. अरविंदर सिंग लवली यांचा अपवाद वगळता ए.के.वालिया, किरण वालिया, हारुन युसूफ आणि राजकुमार चौहान हे काँग्रेसचे सर्व मंत्री आपाल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत.
२००८ दिल्ली विधानसभा ७० जागा
पक्ष जागा
काँग्रेस ४१
भाजप २४
बहुजन समाजवादी पार्टी २
लोक जनशक्ती पार्टी १
राष्ट्रीय जनता दल १
अपक्ष १