दिल्लीला ६० टक्के पाणीपुरवठा करणा-या हरियाणातील मुनाक तलावाचा ताबा सुरक्षा दलांनी घेतला आहे.
नवी दिल्ली/चंदीगड – दिल्लीला ६० टक्के पाणीपुरवठा करणा-या हरियाणातील मुनाक तलावाचा ताबा सुरक्षा दलांनी घेतला आहे. यामुळे दिल्लीचा पाणीपुरवठा मंगळवारपासून पूर्ववत होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून हरियाणा सरकारला नोटीस बजावली आहे.
दिल्लीपासून १०० किलोमीटरवर असलेल्या सोनेपत येथे हा मुनाक तलाव आहे. या तलावाचे जाट आंदोलकांनी मोठे नुकसान केले. या तलावाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून दिल्लीला जास्तीत जास्त पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सीआरपीएफचे महासंचालक प्रकाश मिश्रा म्हणाले की, सुरक्षा दलांनी या तलावाचा ताबा घेतला असून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुरुस्तीच्या कामासाठी अभियंता व कामगारांच्या मदतीसाठी लष्कर व निमलष्करी दलाचे जवान मदत करत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मागवला अहवाल
या प्रकरणी सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या पीठाने दोन दिवसांत हरियाणा सरकारकडून परिस्थितीजन्य अहवाल मागवला आहे. तसेच न्यायालयाने केंद्र व उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणी दिल्ली सरकारने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून न्यायालयाने दिल्ली सरकारला झापले. दोन सरकारमधील प्रश्नांवर तुम्ही तोडगा काढायला हवा होतात, असे पीठाने स्पष्ट केले.