दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ९ विकेटनी मात करताना माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्सनी नवव्या हंगामाची विजयी सुरुवात केली.
कोलकाता- दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ९ विकेटनी मात करताना माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्सनी नवव्या हंगामाची विजयी सुरुवात केली. फिरकी गोलंदाजांची कामगिरी यजमानांच्या मोठय़ा विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.
दिल्लीचे अवघ्या ९९ धावांचे आव्हान कोलकाताने सलामीवीर रॉबिन उथप्पाच्या (३३ चेंडूंत ३५ धावा) बदल्यात पार केले. कर्णधार गौतम गंभीरने (४१ चेंडूंत नाबाद ३८ धावा) उथप्पासह ६९ धावांची झटपट सलामी देताना १४.१ षटकात कोलकात्याला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, डावखुरा फिरकीपटू ब्रॅड हॉगसह (४-१-१९-३) आणि लेगस्पिनर पियुष चावला (२१-२) तसेच मध्यमगती गोलंदाज आंद्रे रसेल (२४-३) आणि जॉन हॅस्टिंगच्या (५-२) अचूक मा-यासमोर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव १७.४ षटकांत केवळ ९८ धावांत आटोपला.
दिल्लीच्या पाच फलंदाजांनी दोन आकडी धावा केल्या. त्यात सलामीवीर क्विंटन डी कॉकचे (१७) सर्वाधिक योगदान आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरला खातेही खोलता आले नाही. मयांक अगरवाल (९), करुण नायर (३) हे आघाडीचे फलंदाजही अपयशी ठरले.
कोलकात्याच्या गोलंदाजांनी अचूक आणि प्रभावी मारा केला तरी तब्बल १२ वाईडसह अवांतर १२ धावा दिल्या. मध्यमगती आंद्रे रसेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.