दिमापूरमधील फाशी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केल्याची माहिती नागालँडचे मुख्यमंत्री टी.आर.झेलिंग यांनी दिली.
कोहिमा – नागालँडमधील दिमापूरमध्ये संतप्त नागरिकांनी बलात्कारित आरोपीला तुरुंगात बाहेर काढून त्याला चौकात फाशी दिल्याप्रकऱणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी नागालँड सरकारने शिफारस केल्याची माहिती नागालँडचे मुख्यमंत्री टी.आर.झेलिंग यांनी दिली.
बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत सीबीआय चौकशीचा निर्णय घेण्यात आल्याचे झेलिंग यांनी सांगितले.
पाच मार्च रोजी नागा समुदायाच्या मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या सय्यद फरीद खानला दिमापूरमधील नागरिकांनी खेचतच तुरुंगाबाहेर आणले. त्यानंतर त्याची शहरभर धिंड काढण्यात आली. तसेच त्याला मारहाणही केली. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी त्याला भर चौकात फाशी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ५५ जणांना अटक केली आहे. तर ३४ जणांची सुटका करण्यात आली आहे.
याआधी २४ फेब्रुवारी रोजी बलात्काराच्या आरोपाखाली खानला आसामच्या करिमगंज जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.