सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा (८०) यांना शनिवारी रात्री उशीरा वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे.
मुंबई- सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा (८०) यांना शनिवारी रात्री उशीरा वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना डेंग्यू आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे थकवा आल्याने रुग्णालयात दाखल केल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच प्रकृतीच्या चौकशीसाठी बॉलिवूडमधील दिग्गजांसह त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांची फोनद्वारे चौकशी केली. या सर्वांचे यशराज फिल्मतर्फे आभार मानले आहेत.
यश चोप्रा यांनी गेल्या महिन्यात चित्रपट दिग्दर्शनातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘जब तक है जान’ हा चित्रपट दिवाळीत १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत.