दाभोळ येथील दत्तमंदिरात श्री देवदत्त ट्रस्ट, यांच्यातर्फे नुकत्याच झालेल्या सांगता समारंभात ‘स्वर गुंजन’ या संगीतमय कार्यक्रमात भाग्यश्री भागवत व अजिंक्य पोंक्षे या उदयोन्मुख गायकांनी सादर केलेल्या गीतगायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
दाभोळ – येथील दत्तमंदिरात श्री देवदत्त ट्रस्ट, यांच्यातर्फे नुकत्याच झालेल्या सांगता समारंभात ‘स्वर गुंजन’ या संगीतमय कार्यक्रमात भाग्यश्री भागवत व अजिंक्य पोंक्षे या उदयोन्मुख गायकांनी सादर केलेल्या गीतगायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. टाळय़ा आणि वन्समोअरच्या जल्लोषात रसिकांनी या संगीतमय कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.
कै. भाई नरवणकर सभागृहात नाना कुलाबकर आणि बंधू यांच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘पंचतुंड नरूतुंड’ या नांदीने झाली. ‘सुंदर ते ध्यान’, ‘मी राधिका’, ‘गुंतता हृदय’ ही गाणी सादर करून प्रज्ञा देसाई हिने ‘असा बेभान हा वारा’ हे गीत व्हायोलिनवर उत्तम प्रकारे वाजवले. ‘दत्त दत्त नामाचा रे’ व गौळण ‘वृंदावनी वेणू’ या गाण्यांना वन्समोअर मिळाला. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली.
भाग्यश्री भागवत व अजिंक्य पोंक्षे यांच्या सुमधूर आवाजाने संगीत मैफल अधिकच रंगली. तबलावादक देवीदास दातार, पखवाज वादक दिनेश मोरे, ऑर्गन सुशील गद्रे, हार्मोनियम हेमंत देशमुख, व्हायोलिन प्रज्ञा देसाई, निवेदक प्रकाश गांधी यांच्या साथीने संगीताची मैफल अधिकच रंगली. सर्व गायक वृंदाचा श्री देवदत्त ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात विविध स्पर्धाचा बक्षीस समारंभ व दत्तभक्तसदानंद महाडिक यांचा नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.