तालुका आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्यात सार्वजनिक वापर होत असलेल्या पाण्याच्या स्त्रोताचे पाणी नमुने तपासणीसाठी गोळा करून ते जिल्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. गेल्यावर्षी तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण २ हजार ८२२ पाणी नमुने घेण्यात आले होते.
दापोली – तालुका आरोग्य विभागांतर्गत आठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये गेल्या वर्षात घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यापैकी १६२ पाणी नमुने दूषित आढळले. यात सर्वाधिक ४२ नमुने पसई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील आहेत.
तालुका आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्यात सार्वजनिक वापर होत असलेल्या पाण्याच्या स्त्रोताचे पाणी नमुने तपासणीसाठी गोळा करून ते जिल्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. गेल्यावर्षी तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण २ हजार ८२२ पाणी नमुने घेण्यात आले होते. यामध्ये आसूद केंद्रांतर्गत २२७, दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१९, आंजर्ले ३४९, साखळोली ३१७, केळशी २९०, फणसू ४३१, उंबर्ले ४३८ आणि पिसई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक ५५१ नमुन्यांचा समावेश होता. जिल्हा प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार यापैकी १६२ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पिसई प्राथमिक केंद्रांतर्गत ४२, उंबर्ले ३०, आसूद २६, दाभोळ आणि फणसू प्रत्येकी १७, केळशी १६, आंजर्ले ३ आणि साखळोली केंद्रातील १ अशी आकडेवारी आहे. दूषित पाणी नमुन्यांपैकी सर्वात जास्त ११ टक्के नमुने आसूद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील असून साखळोली केंद्रातील टक्केवारी सर्वात कमी आहे.
तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये दूषित पाणी नमुन्याची संख्या अधिक असल्याचे या अहवालातून दिसून येत आहे. पावसाच्या सुरुवातीला जून आणि जुलै महिन्यात पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचे प्रमाण अधिक असते. सद्यस्थितीत कडक उन्हामुळे पाण्याची पातळी कमी होत असल्याने दूषित पाण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.
आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून दूषित पाणी असलेल्या गावातील स्त्रोतांचे शुध्दीकरण करण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.