सामाजिक भान आणि पर्यावरणीय ठेवा जतन करत दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग सेवा मंडळाचा होलिकोत्सव यंदा ३५व्या वर्षात पदार्पण करत आहे.
मुंबई- सामाजिक भान आणि पर्यावरणीय ठेवा जतन करत दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग सेवा मंडळाचा होलिकोत्सव यंदा ३५व्या वर्षात पदार्पण करत आहे. होळी या परंपरागत सणाचे पावित्र्य जपत समाजातील अनिष्ट प्रथांना मूठमाती देतानाच जिवंत वृक्षांची होणारी हानी टाळून मंडळाचे कार्यकर्ते होळीसाठी कृत्रिम वृक्ष तयार करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
या होलिकोत्सवात दरवर्षी अभिनव व कल्पक विषयांची निवड केली जाते. या वर्षी देशप्रेम, राष्ट्रहिताच्या दृष्टीने ‘जाळूया अहंकारी देशविघातक वृत्ती, घडवूया देशहिताच्या गोष्टी’ या विषयावर आकर्षक सजावट किशोर गावडे व कार्यकर्त्यांतर्फे केली जाणार आहे. या नावीन्यपूर्ण होलिकोत्सवास मंडळाचे रमेश जुकर, मंगेश नार्वेकर, सुनील वानखेडे, संतोष पाटील आदी मंडळींचा सिंहाचा वाटा असतो. सध्याची महाराष्ट्राची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रंग आणि पाणीविरहित होळी साजरी करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष हेमचंद्र पाटील, दीपक मालवणकर, सूरज ठाकूर आणि उदय शिरोडकर यांनी केले आहे.