अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तान आश्रय देत असून त्याचे वास्तव्य सध्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी दिली.
नवी दिल्ली– अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तान आश्रय देत असून त्याचे वास्तव्य सध्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी दिली.
राजधानीत एका वर्तमानपत्राने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. सिंह म्हणाले की, दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान भारतात आले तेव्हाही ही बाब त्यांच्या कानावर घातली होती. आता त्याला पकडण्यासाठी पाकिस्तानावर राजनैतिक दबाव वाढवण्यात येत आहे.
दाऊदला पकडण्यासाठी काही कालावधी द्या. याबाबतच्या धोरणात्मक बाबी जाहीर करू शकत नाही. मात्र, दाऊदला भारताच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही व्यापक प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.
भारतात थैमान घालणारे दहशतवादी संकट पूर्णपणे पाकिस्तान पुरस्कृत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ ही दहशतवाद्यांना मदत करत आहे. २००८ मध्ये मुंबई हल्ल्यातील सूत्रधारांना शिक्षा करण्याबाबत पाकिस्तान गंभीर नाही. त्यामुळेच याबाबतचा खटला अत्यंत संथगतीने सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
भारताला पाकिस्तानच नव्हे तर शेजारच्या प्रत्येक देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. भारताशी मैत्रीचे संबंध ठेवण्यासाठी पाकिस्तानकडूनही प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.