भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेपूर्वी १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेपूर्वी १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भारतीय सुरक्षा यंत्रणेला दाऊदशी संबधित काही कागदपत्रे मिळाली आहेत. ज्यावरुन दाऊद पाकिस्तानात असल्याचे सिद्ध होते. इतकेच नाही तर यंत्रणेकडे ५९ वर्षीय दाऊदचा फोटोही आहे. २०१२ मध्ये हा फोटो घेण्यात आला होता.
सुरक्षा यंत्रणेला मिळालेल्या कागदपत्रांमध्ये केवळ दाऊदच्या घरचा पत्ताच नाही तर त्याचा मोबाईल नंबरही आहे. दाऊद पाकिस्तानात नसल्याचे वारंवार पाकिस्तानकडून सांगण्यात येते. मात्र या पुराव्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
सुरक्षा यंत्रणेला दाऊदची पत्नी मेहजबीन शेख यांच्या नावाचे एप्रिल २०१५ मधील टेलिफोन बिल मिळाले आहे. या टेलिफोन बिलावर डी -१३, ब्लॉक-४, कराची डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, स्कीम- ५, क्लिफ्टन, कराची हा पत्ता दिला गेला आहे.
दाऊदकडे तीन पाकिस्तानी पासपोर्टही आहेत. यामध्ये एका पासपोर्टवर ६ ए, खायाबन तंजीम फेज 5, डिफेन्स हाउसिंग विभाग असा पत्ता देण्यात आला आहे तर दुस-या पासपोर्टवरमोइन पॅलेस, दुसरा मजला, अब्दुल्ला शाह गाजी दर्ग्याजवळ, क्लिफ्टन असा पत्ता देण्यात आला आहे. या पासपोर्टांची कॉपीही गुप्तचर विभागाकडे आहे.
वृत्तपत्रातील माहितीनुसार यंत्रणेला दाऊदच्या कुटुंबियांची कराचीहून दुबईला येण्याजाण्याच्या प्रवासाची कागदपत्रेही मिळाली आहेत. यावर्षी चार जानेवारी रोजी दाऊदची पत्नी, मुलगी आणि जावयाने एमिरेट्स फ्लाईटने कराचीहून दुबईला प्रवास केला होता.