मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आणि भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचे पुरावे भारताच्या गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागले आहेत.
नवी दिल्ली – मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आणि भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचे पुरावे भारताच्या गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागले आहेत. दाऊदने पाकिस्तानातून केलेले काही फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले असून यावरून तो पाकिस्तानातच असल्याचे सिद्ध झाले आहे.
दाऊदचे तीन फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले असून त्यात तो आपल्या व्यवसायासंदर्भात चर्चा करत असल्याचे आढळून आले आहे. हे कॉल्स पाकिस्तानातूनच केले गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे दाऊद पाकिस्तानात नसल्याचा पाकिस्तानचा कांगावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागलेले हे पुरावे भारत सरकार पाकिस्तानच्या हवाली करून दाऊदला परत आणते का? तसेच पाकिस्तान दाऊद त्यांच्याच देशात असल्याचे मान्य करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दाऊदचे हे कॉल्समधील संभाषण त्याचा भारत आणि दुबईमधील व्यवसाय सांभाळणारा खास माणूस जावेद याच्याशी झाले असून त्यात तो फक्त व्यवसायासंबंधी चर्चा करत आहे. याशिवाय तारिक नावाच्या एका व्यक्तीशीसुद्धा तो संपर्कात असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिम हा प्रमुख आरोपी असल्याचे भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले असून त्याला भारताच्या ताब्यात देण्याचीही मागणी केली आहे.
मात्र पाकने दाऊद पाकिस्तानात नसल्याचे सांगत दरवेळी भारताची दिशाभूल केली आहे. त्यानंतर आता दाऊद पाकिस्तानातच असल्याचे ठोस पुरावे भारताच्या हाती लागले असून यानंतरच्या दोन्ही देशांतील चर्चेकडे सध्या देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान,संयुक्त राष्ट्रांचा सदस्य असलेल्या पाकिस्तानने दाऊदसह हाफिज सईद आणि झकी-उर-रेहमान लख्वी या तिघांची संपत्ती जप्त करण्याची मागणी भारत संयुक्त राष्ट्रांद्वारे पाकिस्तानकडे करणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत दहशतवादी आणि भारताच्या गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी होण्याची शक्यता आहे.