कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये होता, परंतु त्याने पाकिस्तान सोडले असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे विशेष दूत शहरयार खान यांचे वक्तव्य खरे असले तरी ते अर्धसत्य असल्याचे समोर आले आहे.
मुंबई- कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये होता, परंतु त्याने पाकिस्तान सोडले असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे विशेष दूत शहरयार खान यांचे वक्तव्य खरे असले तरी ते अर्धसत्य असल्याचे समोर आले आहे.
दाऊद हा पाकिस्तानमध्येच आहे. मात्र ईदनिमित्त तो सौदी अरेबियामध्ये गेला असून, लवकरच पाकिस्तानमध्ये परतणार असल्याचे गुप्तचर विभागाकडून सांगण्यात येत आहे.
दाऊद हा सध्या सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आहे. ईदनिमित्त तो सौदी अरेबियात उमराहसाठी गेला आहे. त्यामुळे सध्या जरी दाऊद सौदी अरेबियात असला तरी पुढील आठवडय़ात तो पाकिस्तानमध्ये परतण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर विभागाकडून सांगण्यात आले आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या या माहितीमुळे पाकिस्तानच्या वक्तव्यातील फोलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
ईदनिमित्त दाऊदचा सहकारी छोटा शकील व नासेर या दोघांनी मुंबईतील आपल्या सहका-यांना कराचीतून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नागपाडा येथे राहत असलेली दाऊदची बहीण हसीना आपा हिच्या दाऊद नेहमी संपर्कात असल्याने तिचा फोन टॅप करण्यात आला होता. यावरून दाऊद हा पाकिस्तानमध्येच असल्याचे स्पष्ट झाल्याचे गुप्तचर विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरयार यांनी असे वक्तव्य का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाकिस्तानचे घुमजाव
लंडन – पाकिस्तान पंतप्रधानांचे दूत शहरयार खान यांनी दाऊदबाबत केलेल्या वक्तव्याला काही तास उलटत नाहीत तोच त्यांनी आपल्याला दाऊदबद्दल काहीही माहीत नसल्याचे सांगत घुमजाव केले. मी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात असतानाही मला दाऊदबाबत माहिती नव्हती. आपण पाकिस्तानमधील वृत्तपत्रांच्या आधारे बोललो होतो.
दाऊदची माहिती कदाचित अंतर्गत मंत्रालयाला असू शकते, पण परराष्ट्र मंत्रालयाला काहीच माहिती नसते, असे त्यांनी सांगितले. दाऊद हा पाकिस्तानमध्ये होता, पण त्याने पाकिस्तान सोडले असून, आता तो सौदी अरेबियात आहे.
पाकिस्तानमध्ये जर तो असता तर त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली असती. नवाझ शरीफ यांचे सरकार गुन्हेगारांविरोधात आहे, असे वक्तव्य शहरयार यांनी शुक्रवारी केले होते.