कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात वास्तव्याला नसल्याचा पाकिस्तानने कितीही दावा केला, तरी तो गेली वीस वर्षे पाकिस्तानातच वास्तव्याला आहे, हे वास्तव आहे. गुप्तचर यंत्रणांकडे दाऊदच्या पाकिस्तानातील वास्तव्याबाबत महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे. पण दाऊदची पाकिस्तानातील पत पाहता पाकिस्तान सरकार त्याला भारताला सुपूर्द करण्यास कधीही तयार होणार नाही, हेदेखील तेवढेच सत्य आहे.
दाऊदच्या पाकिस्तानातील वास्तव्याबाबत गुप्तचर यंत्रणा व मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे महत्त्वाची माहिती आहे. सुरुवातीपासूनच विलासी जीवन जगण्याची सवय असलेल्या दाऊदच्या घरांना ‘व्हाइट हाऊस’ म्हणून संबोधले जाते. गुप्तचर यंत्रणांकडील माहितीनुसार, दुबईत वास्तव्याला असतानाही त्याच्या बंगल्याचे नाव त्याने ‘व्हाइट हाऊस’च ठेवले होते. त्यानंतर ज्यावेळी कराचीमध्ये स्थायिक झाला, त्यावेळीही त्याचा क्लिफ्टन बंगला ‘व्हाइट हाऊस’ म्हणूनच ओळखला जाऊ लागला. दाऊदचे असेच एक ‘व्हाइट हाऊस’ लंडनमध्येही आहे. कराचीत अनेक वर्षे क्लिफ्टन बंगल्यात काढले. त्या काळात तीन मुलींनंतर दाऊदचा एकुलता एक मुलगा ‘मोईन’ याचा जन्म झाला. त्यानंतर त्याने याच परिसरात ‘मोइन मॅन्शन’ नावाचा आलिशान बंगला बांधला. पाकिस्तानातील सर्वाधिक सुरक्षा याच बंगल्याला प्रदान करण्यात आली आहे, असे बोलले तर ते वावगे ठरणार नाही. सूत्रांनुसार, या बंगल्याच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी रेंजर्स तैनात असतात. महागडया शोभेच्या वस्तू, छोटा धबधबा, स्वीमिंग पूल, टेनिस कोर्ट, बिलियर्ड कोर्ट, जॉगिंग ट्रॅक अशा सुयसोयींनी युक्त असा हा बंगला आहे. याशिवाय दाऊदला कपडे व घडयाळ्यांची खूप आवड आहे. महागडी सिगारेट, गॉगल्स, बुटांचाही त्याला शौक आहे. त्याच्याकडील हि-यांच्या पेनाची किंमतच पाच लाख रुपये असल्याचे बोलले जाते. दाऊदकडे काळ्या रंगाची बॉम्बप्रूफ मर्सडिीज कार आहे. विशेष म्हणजे, यावेळी पाकिस्तानी रेंजर्स त्याला सुरक्षा देतात. ती सुरक्षा पाकिस्तानच्या राष्ट्रपतीच्या तोडीची असते. पण एवढया सगळ्या सुखसोयी असल्या, तरी माणूस पैशाने झोप खरेदी करू शकत नाही. नेमकी हीच उक्ती दाऊदच्या बाबतीत खरी ठरते. जीवाच्या भीतीने दाऊद दिवसभर झोपतो व सायंकाळी काम करतो. दाऊदचे पाकिस्तानात केवळ दोनच बंगले नाहीत, त्यांच्याशिवाय खयाबाने शमशेर येथे त्याची मालमत्ता आहे. तसेच कराचीतील शाह राहे फैजल, लाहोरमध्ये मदिना मार्केट, पेशावरमधील ओरकाझाय येथेही त्याच्या मालमत्ता आहेत. या गोष्टी पाकिस्तानी सरकारने कितीही नाकारल्या, तरी हे वास्तव आहे. ते कधीही लपून राहणार नाही.
दाऊदबाबत एवढी माहिती असतानाही ते सिद्ध करणे तेवढेच कठीण काम आहे. वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांमधील दाऊदची छायाचित्रे ही २० वर्षापूर्वीची आहेत. २६ डिसेंबर १९५५ ला जन्मलेला दाऊद आता ५७ वर्षाचा आहे. पाच फुट ११ इंच उंच व भक्कम बांधा असलेल्या दाऊदमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्याचे सध्याचे छायाचित्रही उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची ओळख पटवणे खूप कठीण काम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकेकाळी दाऊदची ओळख बनलेली त्याची मिशी त्याने काढली आहे. डोक्यावर काहीसे टक्कल पडले आहे. तसेच तो पूर्वीपेक्षा जाड झाल्याचेही समजते. याशिवाय दाऊदची ओळख पटवण्यातील सर्वात मोठा अडसर म्हणजे त्याचे नाव. साहजिकच पाकिस्तानात तो दाऊद नावाने वास्तव्याला नाही. दाऊदची ३०हून अधिक टोपणनावे आहेत. त्यात शेख दाऊद हसन हे सर्वात प्रचलित आहे. याच नावाने तो पाकिस्तानात ओळखला जातो. काही जण डेव्हिड अथवा भाई म्हणूनही हाक मारतात. दिल्ली अथवा मुंबईतील नातेवाईक व मित्रपरिवाराला तो आजही दूरध्वनी करतो. त्यावेळी हा दूरध्वनी हाजी साहब किंवा आमीर साहब या नावाने असतो. हजारों कोटींचा मालक असणारा दाऊद पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. २००० मध्ये सर्वत्र मंदीचे वातावरण असताना पाकिस्तानातील सेंट्रल बँक पूर्णपणे डबघाईला आली होती. त्यावेळी त्या परिस्थितीतून दाऊदनेच या बँकेला आर्थिक मदत केली होती. त्यामुळे अशा व्यक्तीला पाकिस्तान सहजासहजी भारताकडे सोपवेल, याचा स्वप्नातही विचार करता येऊ शकत नाही. एवढेच नाही, तर दाऊदचे भारतातील नेटवर्कही अगदी वरच्या पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे ‘रॉ’ व ‘आयबी’सारख्या गुप्तचर यंत्रणांनी दाऊदचा काटा काढण्यासाठी यापूर्वीही केलेले प्रयत्न अपयशी ठरले. भारत-पाकिस्तानासह दाऊदच्या काळ्या धंद्याचे नेटवर्क नेपाळ, थायलंड, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रिटन, दुबई, सिंगापूर, श्रीलंका, जर्मनी व फ्रान्स या देशांमध्येही पसरले आहे. त्यात ड्रग्स व बनावट नोटांची तस्करी, हवाला व सट्टा या काळ्या धंद्यांचा समावेश आहे. त्यामुळे हजारो कोटींचा मालक असणा-या दाऊदसाठी पाकिस्तान एकदाच काय हजार वेळा घूमजाव करून नाचक्की सहन करेल, यात शंका नाही.