मी दाऊद इब्राहिमला घाबरत नाही परंतू मुंबईचे काही पोलीस अधिकारी दाऊदला मिळाले असून त्यांच्याकडून मला धोका आहे, असा खळबळजनक आरोप गँगस्टर छोटा राजनने केला आहे.
बाली- मी दाऊद इब्राहिमला घाबरत नाही परंतू मुंबईचे काही पोलीस अधिकारी दाऊदला मिळाले असून त्यांच्याकडून मला धोका आहे, असा खळबळजनक आरोप गँगस्टर छोटा राजनने केला आहे.
मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छोटा राजनने मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांतील काही जण दाऊदसोबत काम करत असल्याचा आरोप राजनने केला आहे. माझ्यावरील सर्व केसेस खोट्या आहेत, असा दावाही त्याने केला.
इंडोनेशियातील बालीमध्ये अटक झाल्यानंतर छोटा राजनला भारतात आणण्यासाठी सीबीआय, दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांचे एक पथक बालीमध्ये दाखल झाले आहे. येत्या दोन तीन दिवसांत छोटा राजनला भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.
सरकारला मला जिथे ठेवावे असे वाटते तिथे ठेवावे. परंतू मुंबई पोलिसांनी माझ्यावर यापूर्वी खूप अत्याचार केले आहेत. त्यामुळे सरकारने त्या दृष्टीने विचार करावा आणि माझ्यावर अन्याय करु नये, एवढीच आपली इच्छा असल्याचे राजनने सांगितले. तू मुंबईला जाणार की दिल्लीला या प्रश्नावर बोलताना राजनने आपल्या व्यथा व्यक्त केल्या.
मी दाऊदला घाबरत नाही. मी आयुष्यभर दहशतवाद आणि दाऊदशी लढलो आहे. त्यामुळे सरकारने माझ्याकडे सहानभुतीच्या दृष्टीकोनातून पहावे, अशी विनंती छोटा राजनने सरकारला केली आहे.