अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या शरणागती पत्करण्याच्या इच्छेची मला राम जेठमालानी यांनी माहिती दिली होती.
मुंबई – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम शरण येण्यास तयार आहे, असा प्रस्ताव ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी आपल्यापुढे ठेवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी हे मान्य केले आहे. मात्र देशद्रोहाचे आरोप असलेल्या दाऊदच्या अवास्तव मागण्या आणि जाचक अटींमुळे हा प्रस्ताव आपल्या तत्कालीन सरकारने फेटाळल्याचा खुलासा त्यांनी केला.
दाऊद भारतात परतण्यास तयार होता. मात्र महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हा प्रस्ताव अमान्य केल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी म्हटले होते. जेठमलानी यांच्या या मुलाखतीने देशभर खळबळ उडवून दिली असताना शरद पवार यांनी हा प्रस्ताव का फेटाळला, यांचे स्पष्टीकरण शनिवारी प्रसिद्धीमाध्यमांपुढे दिले.
१९९० साली शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जेठमलानी यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील हे शरण येण्यास तयार आहेत, असा प्रस्ताव त्यांच्या सरकारपुढे ठेवला होता. जेठमलानी यांनी आपल्यापुढे ठेवलेला हा प्रस्ताव खरा आहे. पण, त्यावेळी दाऊदने केलेल्या अवास्तव मागण्या आपल्याला मान्य झाल्या नाहीत, असे पवार यांनी स्पष्ट केले.
जेठमलानी यांनी आपल्यापुढे ठेवलेल्या प्रस्तावात दाऊद शरण येण्यास तयार आहे, मात्र मुंबईत आल्यावर आपल्याला अटक होता कामा नये. आपल्याला आपल्या घरीच राहण्याची परवानगी मिळावी, असे त्याचे म्हणणे होते. दाऊदच्या या जाचक अटी अमान्य करताना देशाच्या कायद्यापुढे कुणीच मोठा नाही. दाऊदला त्याचे पालन करावेच लागेल, अशी ठाम भूमिका आपण जेठमलानी यांच्यापुढे घेतल्याचे पवार यांनी शनिवारी प्रसिद्धी माध्यमांपुढे बोलताना स्पष्ट केले.
मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेला दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील हे दोघेही भारतात परतण्यास तयार होते. मात्र तेव्हाचे तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दाऊदच्या जाचक अटी फेटाळून लावत त्याच्या शरणागतीचा प्रस्ताव अमान्य केला होता. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या या खुलाशाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण देताना दाऊदच्या जाचक अटी मान्य नसल्यानेच त्याच्या शरणागतीचा प्रस्ताव फेटाळल्याचे सांगत हा चेंडू पुन्हा जेठमलानी यांच्या कोर्टात टोलवला आहे.