कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमची बहिण हसिना परकार हिचा रविवारी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.
मुंबई- कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमची बहीण हसिना परकार ऊर्फ ‘आपा’ हिचा हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी दुपारी मृत्यू झाला. तिच्या अंत्ययात्रेत सहभागी राहणा-यांवर गुप्तचर यंत्रणांची करडी नजर राहणार आहे. गुन्हे शाखेचे अधिकारीही त्यावर लक्ष ठेऊन राहतील.
हसिनाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रविवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास डोंगरी येथील हबीब रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयाच्या तिस-या मजल्यावरील एचडीयू कक्षात तिला दाखल करण्यात आले. तेथील डॉ. हसनैन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर उपचार सुरू होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास तिला मृत घोषित करण्यात आले. रविवारी रात्रीच चर्नी रोड येथील बडा कब्रिस्तानमध्ये तिच्यावर अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे समजले. नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंटमध्ये राहणा-या हसिनाच्या विरोधात खंडणीच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या.
२००७ मध्ये एका ब्रोकरकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी हसिनाविरोधात गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. पण, पुराव्यांअभावी तिच्या विरोधातील एकही गुन्हा पोलिस सिद्ध करू शकले नाहीत.