दाऊदचा साथीदार आणि १९९३ बाँबस्फोटांमधील प्रमूख आरोपी इक्बाल मिर्ची याचा लंडनमध्ये ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
लंडन- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा विश्वासू साथीदार आणि १९९३ च्या बाँबस्फोटांमधील प्रमूख आरोपी मुहम्मद इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची (६३) याचा लंडनमध्ये बुधवारी रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
दाऊदचा उजवा हात मानला जाणारा इक्बाल मिर्ची हा ड्रग माफिया म्हणून गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध होता. तो दाऊदचा तस्करीचा व्यापार सांभाळत होता. भारत सरकारने इक्बाल मिर्चीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही काढली होती. गेल्या काही दिवसांपासून इक्बाल लंडनमध्ये वास्तव्यास होता. भारताने त्याच्या हस्तांतरणासाठी ब्रिटन सरकारकडे पाठपुरावादेखील केला होता. नुकत्याच झालेल्या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची सूत्रे त्यानेच हलवल्याचा संशय आहे.
लंडनच्या ईशान्य भागात हॉर्नचर्च येथील एसेक्स टाऊन परिसरात सहा खोल्यांच्या आलिशान फ्लॅटमध्ये पत्नी आणि मुलांसह तो राहत होता. २०११ मध्ये त्याला ड्रग्जच्या एका प्रकरणात लंडन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर तो जामिनावर सुटला होता. त्याआधी दुबई तसेच अमेरिकेतही त्याचे वास्तव्य होते. स्कॉटलंड पोलिसांनी १९९५ मध्ये आणि २००४ मध्ये त्याला अमेरिकेच्या इलिनॉईस राज्यात अटक झाली होती. मात्र तेथेही त्याची सुटका झाली होती.