अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या एका सहका-याला खंडणी आणि मारहाणीच्या गुन्ह्यांतर्गत जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या एका सहका-याला खंडणी आणि मारहाणीच्या गुन्ह्यांतर्गत जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
इस्टेट एजंट सलीम शेख (४८) यांनी सोमवारी रात्री इक्बाल व त्याच्या दोन साथीदारांविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. अखेर इक्बाल आणि शब्बू या दोघांना मंगळवारी अटक केल्याचे जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मडवी यांनी सांगितले.
इक्बालने इस्टेट एजंट सलीम शेख यांच्याकडे मागिल शुक्रवारी तीन लाख रुपये खंडणी मागितली होती. तसेच दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया स्ट्रीटवरील ‘डांबरवाला बिल्डिंग’मध्ये बोलवून शेख यांना मारहाणही करण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण जे. जे. मार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आले होते.
इक्बाल हा दाऊदचा पाचवा भाऊ आहे. सारा सहारा प्रकरणातील तो आरोपी असून २००३ मध्ये त्याला युनायटेड अरब अमिराती येथून भारतात आणले होते. यानंतर त्याला मोक्का कायद्याखाली अटकही झाली होती. त्याच्यावर खूनाचा गुन्हाही दाखल होता. मात्र या दोन्ही प्रकरणात कोणतेही पुरावे नसल्याने न्यायालयाने २००७ मध्ये त्याची मुक्तता केली होती.